
परुळेकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
कासा, ता. २७ (बातमीदार) : कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक व पदवी वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आदिवासी समाजाच्या संपूर्ण इतिहासाचा मागोवा घेतला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ल. शि. कोम यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी आदिवासी प्रगती मंडळाची वाटचाल व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी संस्थेचे सचिव रूपेश राणे, उद्योजक अजित नार्वेकर, प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, ग्रंथालय विभाग इत्यादी विभागातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पदवी प्रदान कार्यक्रमातून मुंबई विद्यापीठात शैक्षणिक प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ. रावसाहेब पवार यांनी केले.