पदपथावरील मोबाईल टॉवर अखेर हटवला

पदपथावरील मोबाईल टॉवर अखेर हटवला

शिवडी, ता. २७ (बातमीदार) ः दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्ग शिवाजी मंदिरसमोरील बस थांब्याजवळील पदपथावर मोबाईल टॉवर उभारला होता. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन लहान मुलांसह ज्‍येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्‍यामुळे स्थानिकांनी या टॉवरला विरोध दर्शवला. यासंदर्भात ‘सकाळ’ने १० मार्च रोजी ‘दादरमधील पदपथावर मोबाईल टॉवरचा अडथळा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पालिकेने संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी (ता. २५) अखेर येथील मोबाईल टॉवर हटवला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्ग शिवाजी मंदिरसमोरील बस थांब्याजवळील पदपथावर खोदकाम करून मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. हा रस्ता जास्त वर्दळीचा व गर्दीचा असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करणे कठीण झाले होते; तर या टॉवरला येथील स्थानिक रहिवाशांचादेखील विरोध होता. तसेच पदापथावर टॉवर उभारण्याच्या परवानगीविरुद्ध महानगरपालिका मुख्य अभियंता सुनील राठोड यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातील विभागप्रमुख महेश सावंत, शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, अक्षय शिंगरे, संतोष देवरुखकर यांच्‍यासह स्थानिक रहिवासी विष्णू देवरकर यांनी भेट घेऊन लेखी पत्राद्वारे या टॉवरला विरोध दर्शवला होता. त्‍याची दखल घेत हा टॉवर हटवला आहे.

न्‍यायालयाच्‍या आदेशाची पायमल्‍ली?
पदपथ हे नागरिकांना चालण्याच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले असून यावर कोणताही व्यवसाय करण्यास देऊन नये, असे न्यायालयीन आदेश आहेत. असे असतानादेखील दादर पश्चिम येथील केळकर मार्गावरील पदपथावर न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत येथे मोबाईल टॉवर उभारला होता. या टॉवरमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असल्याने या टॉवरला येथील स्थानिकांचा विरोध होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com