अनधिकृत बांधकामास पुन्हा अभय

अनधिकृत बांधकामास पुन्हा अभय

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : केडीएमसी हद्दीतील बेकायदा बांधकाम तोडायचे असेल तर पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली जाते. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण देत अनेकदा पालिका अधिकारी या कारवाईत चाल ढकल करतात; तर पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे पालिका आणि पोलिस प्रशासन या दोघांच्या या वेळकाढूपणामुळे शहरात बेकायदा बांधकामांना अभय मिळत आहे. गावदेवी मंदिराजवळ सुरू असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाईचे दोनदा आदेश निघाले, परंतु पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होऊनही या बांधकामांना लगाम घालण्यात पालिका प्रशासनास यश आलेले नाही. शहरातील ६५ बेकायदा बांधकामांचा विशेष तपास पथकाकडून तपास सुरू झाला. ईडीकडूनही तपास सुरू होऊनही येथील भूमाफियांना जरब बसली नाही. शहरात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झपाट्याने सुरू आहेत. कारवाई होऊनही पुन्हा त्या ठिकाणी बांधकाम हे भूमाफिया करत आहेत. अशा अनेक इमारती शहरात कारवाई झाल्यानंतर पुन्हा उभ्या राहिल्या असून त्यात नागरिकदेखील राहण्यास आले आहेत.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावर गावदेवी मंदिराजवळील आरक्षित भूखंडावर बेकायदा बांधकाम उभारण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या बेकायदा बांधकामांचा मुद्दा कल्याण ग्रामीण व कल्याण पूर्वच्या आमदारांनी उपस्थित केला होता. पालिकेच्या फ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी या बेकायदा बांधकामप्रकरणी दोघांवर एमआरटीपीचा गुन्हा जानेवारी महिन्यात दाखल केला होता. तसेच १० जानेवारीला या बेकायदा बांधकामावर तोडक कारवाई पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार होती. टिळक नगर पोलिस ठाण्यात मनुष्यबळ कमी असल्याचे कारण त्या वेळी देण्यात आले होते. आजच्या घडीला या इमारतीचे सात मजली बांधकाम पूर्ण झाले आहे. याविषयी दै. ‘सकाळ’ने १७ एप्रिलला ‘बेकायदा बांधकामांचे ग्रहण’ या मथळ्याखाली वृत्तदेखील प्रसारित केले होते. ६५ बेकायदा बांधकामांविषयी लढा देणारे वास्तुविशारद संदीप पाटील यांनीदेखील या बेकायदा बांधकामाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. या सर्व प्रकरणाची पालिका आयुक्त डॉ. दांगडे यांनी दखल घेत या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार २७ एप्रिलला या बेकायदा बांधकामावर कारवाई होणार होती; मात्र पोलिस बंदोबस्त न मिळाल्याचे कारण पालिका अधिकाऱ्यांकडून या वेळीही देण्यात आले. दोनदा आदेश काढूनही केवळ पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने या अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही. यामुळे शहरात प्रशासन आणि कायदा शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
...
चौकशीनंतर परिस्थिती जैसे थे
अनधिकृत बांधकामांना आज अभय मिळत आहे. इतर बेकायदा बांधकामांना पोलिस बंदोबस्त दिला जातो. आरक्षित भूखंडावरील बांधकामांना मात्र दिला जात नाही. वरून दबाव आल्यामुळे पोलिस बंदोबस्त दिला जात नाही, दरवेळेस असे होते. यामुळे बेकायदा बांधकामे वाढत आहेत. ६५ इमारतींची चौकशी लागूनदेखील परिस्थिती जैसे थे आहे, असे तक्रारदार संदीप पाटील यांनी सांगितले.
.....
ठाणे पोलिस आयुक्तालयाने पालिका प्रशासनास १ अधिकारी व ३५ कर्मचारी दिलेले आहेत. त्या पोलिस बळाचा वापर पालिकेने केल्यास त्यांना आमच्याकडे पोलिस बंदोबस्त मागावा लागणार नाही. कारवाई करताना काही अडथळा आला किंवा काही परिस्थिती उद्‌भवली तर पोलिस प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहे.
- सचिन गुंजाळ, पोलिस उपायुक्त कल्याण परिमंडळ ३

गुरुवारी कारवाई करण्यात येणार होती, परंतु पोलिस बंदोबस्त मिळाला नाही. पुढील आठवड्यात पुन्हा कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सुधाकर जगताप, उपायुक्त, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग

मानपाडा रोडवरील बेकायदा बांधकामावर कारवाई पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- भरत पाटील, सहायक आयुक्त, फ प्रभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com