कळंबोलीत उबेर चालकाची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबोलीत उबेर चालकाची लूट
कळंबोलीत उबेर चालकाची लूट

कळंबोलीत उबेर चालकाची लूट

sakal_logo
By

पनवेल, ता. २७ (वार्ताहर) : कळंबोली येथे भाड्याच्या प्रतीक्षेत कारमध्ये झोपी गेलेल्या एका उबेरचालकावर दोघा लुटारूंनी स्क्रू ड्रायव्हरने वार करून त्याचा मोबाईल फोन व रोख रक्कम लुटल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारूंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील जखमी उबेर चालकाचे नाव अबु बक्कर ताहेजअली सिद्धिकी (वय २९) असे आहे. तो तुर्भे येथील इंदिरा नगरमध्ये राहण्यास आहे. अबु हा उबेरची कार चालवत असून, बुधवारी रात्री ११ वाजता त्याने कारमध्ये घाटकोपर येथून खारघरचे भाडे घेतले होते. त्‍या प्रवाशाला खारघर येथे सोडल्यानंतर अबु कळंबोली ब्रीजजवळील पंपावर सीएनजी भरण्यासाठी गेला होता. सीएनजी भरल्यानंतर अबु हा रात्री एकच्या सुमारास दुसऱ्या भाड्याची वाट पाहत गाडीतच झोपी गेला.
पहाटे साडेचारच्या सुमारास त्याच्या कारजवळ आलेल्या दोघा लुटारूंनी कारची काच वाजवल्यामुळे प्रवासी असल्याचे समजून अबूने दरवाजा उघडला. त्यानंतर दोघा लुटारूंनी अबुला लुटण्यासाठी त्याला मारहाण केली. तसेच त्याचा मोबाईल खेचून घेतला. त्यानंतर या लुटारूंनी त्याच्याकडे पर्स मागण्यास सुरुवात केली असता अबुने दोघा लुटारूंचा प्रतिकार केला. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या लुटारूने अबुच्या डोक्यात दगड मारला. बाजूच्या सीटवर बसलेल्या दुसऱ्या लुटारूने अबूच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हरने वार करून त्याला जखमी केले. या प्रकारात जखमी झालेल्या अबुने एका नागरिकाच्या मदतीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अबुला एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.