
मध्य रेल्वेकडून अतिरिक्त १६ अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या
मुंबई, ता. २७ : मध्य रेल्वेने मुंबई ते गोरखपूर आणि पुणे ते दानापूरदरम्यान १६ अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने या आधीच ९०० उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या ९१६ वर पोहचली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)- गोरखपूर साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडीच्या ८ फेऱ्या होणार आहेत. ट्रेन क्र. ०११२३ ही गाडी एलटीटी येथून २८ एप्रिल ते १९ मे पर्यंत (४ फेऱ्या) दर शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता सुटेल. ट्रेन क्र. ०११२४ ही गाडी गोरखपूर येथून २९ एप्रिल ते २० मे २०२३ पर्यंत (४ फेऱ्या) दर शनिवारी रात्री ९.१५ वाजता एलटीटीसाठी सुटेल. पुणे-दानापूर साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडीच्या ८ फेऱ्या धावणार आहेत. ट्रेन क्र. ०११२१ ही एक्स्प्रेस ३० एप्रिल ते २१ मे पर्यंत (४ फेऱ्या) दर रविवारी पुण्याहून दुपारी ४.१५ वाजता सुटेल. ट्रेन क्र. ०११२२ ही एक्स्प्रेस २ मे ते २३ मे पर्यंत (४ फेऱ्या) दर मंगळवारी मध्यरात्री १२.१५ वाजता दानापूर येथून पुण्यासाठी सुटेल.