गावठाणांमध्ये जीर्ण मलनि:सारण वाहिन्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावठाणांमध्ये जीर्ण मलनि:सारण वाहिन्या
गावठाणांमध्ये जीर्ण मलनि:सारण वाहिन्या

गावठाणांमध्ये जीर्ण मलनि:सारण वाहिन्या

sakal_logo
By

जुईनगर, ता. २७ (बातमीदार) : नवी मुंबईतील गाव आणि गावठाण भागात मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यास नवी मुंबई पालिका आजही अपयशी ठरली आहे. आजमितीला शिरवणे गाव, जुईपाडासह नवी मुंबईतील बहुतांश गाव-गावठाण परिसरातील अनेक ठिकाणच्या मलनि:सारण वाहिन्या नाले व गटारांना जोडलेल्या आहेत. या वाहिन्या जुन्या असल्याने त्या ठिकठिकाणी तुटलेल्‍या आणि गंजलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना उग्र वासाचा सामना करावा लागत आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरातील गाव आणि गावठाण भागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या ठिकाणचे भूमाफिया पालिकेच्या विभाग कार्यालयाच्या संपर्कात राहून अपेक्षित कामे करून घेत आहेत. त्यामध्ये ते बिनधास्त गटारात मलनि:सारण वाहिन्या सोडून देतात. याचा परिणाम परिसरात दुर्गंधी पसरत असून मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. नवी मुंबईतील शिरवणे गाव व जुईपाडासह बहुतांश गाव आणि गावठाण भागात नव्याने मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. शिरवणे गाव व गावठाणमधील जीर्ण आणि नादुरुस्त मलनि:सारण वाहिन्या नवी मुंबई पालिकेने बदलाव्यात, अशी मागणी वर्षानुवर्षे केली जात आहे. २० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या या वाहिन्या ठिकठिकाणी तुटलेल्या व गंजलेल्या अवस्थेत आहेत. त्यातून दुर्गंधीयुक्त उग्र वास येत असतो. या वासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यात लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्याचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत शिरवणे व जुईपाडा गावठाण भागात काही ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या आहेत; परंतु नागरिकांच्या संख्येनुसार त्या वाहिन्या अपुऱ्या पडत आहेत. तर काही ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या कमी व्यासाच्या असल्याने मल तुंबण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. या बदलण्याची मागणी सातत्याने होत आहे.

पूर्वीचे शिरवणे गाव लोकसंख्येने लहान होते. आज शिरवणे गाव विस्तारले आहे. घरांची संख्या चौपट झाली आहे; मात्र पूर्वीचीच मलनि:सारण वाहिनी असल्याने ती तुंबण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. काही चेंबर घुशीने पोखरले असून, त्यात गाळ साचल्याचे दिसून येते. त्याची साफसफाई करणे कठीण होते. जुनाट व जीर्ण अवस्थेतील ही वाहिनी बदलून मोठ्या व्यासाची टाकावी, असे पत्र नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिले आहे.
- संतोष सुतार, अध्यक्ष, नवी मुंबई काँग्रेस ओबीसी सेल

शिरवणे येथील नागरिकांच्या मलनि:सारण वाहिन्यांबाबत तक्रार आल्यास त्याचे त्वरित निराकरण केले जाते. वाढीव बांधकामामुळे काही ठिकाणी वाहिन्यांची समस्या निर्माण झाली आहे. नवीन वाहिन्या टाकण्याच्या कामाची निविदा काढण्यात आली असून, लवकरच ते सुरू होईल.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका