
दागिने चोरी करणारे अटकेत
मुंबई, ता. २७ : व्यावसायिकाच्या घरातून सुमारे दोन कोटींचे दागिने चोरी केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. आरोपींमध्ये घरात काम करणारी मोलकरीण मायलेन सुरेनसह ५ आरोपींचा समावेश आहे. कारवाईत पोलिसांनी दागिने हस्तगत केले आहेत. व्यावसायिक शरदकुमार शाम सांगी हे दक्षिण मुंबईतील कारमायकल रोड येथे राहतात. २२ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत त्यांचे दागिने चोरी झाल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आले आहे. सांगी यांनी केलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी नोकर मायलेन सुरेन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. लॉकरमध्ये दागिने ठेवल्याची माहिती मायलेनला होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मायलेनला अटक केली. या गुन्ह्यात मायलेनबरोबर अब्दुल मुनाफचाही सहभाग असल्याचे उघड झाले. अब्दुल राज्याबाहेर पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला जोगेश्वरी रेल्वेस्थानकावरून अटक केली.