
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर चौघांचा अत्याचार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : कल्याणमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. इन्स्टाग्रामवर एका तरुणासोबत मुलीची ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांनी मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार केला आहे.
कल्याणमध्ये राहणारी पंधरा वर्षीय पीडिता हरवल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता २२ एप्रिलला सकाळी ती कल्याण रेल्वेस्थानक येथे पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेत चौकशी केली असता तिची आरोपीमधील एका तरुणाशी ओळख झाली होती. मैत्री झालेल्या तरुणांनी तिला भेटण्यास बोलावून घेतले. त्याच्यावर विश्वास ठेवत मुलगी उल्हासनगर येथे गेली. यावेळी त्याने तिला मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही एका मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने त्याच्या तीन मित्रांनाही तेथे बोलावून घेतले, त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला.
मुलीच्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचाराचा गुन्हा कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले असून, यात एक अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. साहिल राजभर, सुजल गवळी आणि विजय बेरा अशी तीन आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे करीत आहेत.