
अंबरनाथला काँग्रेसचा जलआक्रोश मोर्चा
अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार) : पावसाळ्यात धरणे ओव्हर-फ्लो होऊनही अंबरनाथ पश्चिमेला काही भागात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवरून काँग्रेसने आक्रोश मोर्चा काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर आज धडक दिली. पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. तत्पूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त घ्या, पण पाणी द्या, अशी भावनिक साद घालण्यात आली.
अंबरनाथच्या पश्चिम भागातील कोहोजगाव, फुलेनगर, जावसई, महेंद्रनगर, उलनचाळ आदी परिसरात भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाई विरोधात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अंबरनाथ काँग्रेस कार्यालयापासून पाणी खात्याच्या कार्यालयावर निघालेल्या मोर्चामध्ये नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पावसाळ्यात धरणे भरून वाहू लागतात, काही भागात पुरेसे पाणी, तर काही भागात पाणीसमस्या जाणवते, पाणी मुरते कुठे, असा सवाल उपस्थित करून याला जबाबदार कोण, असा प्रश्न काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी विचारला. कोहोजगाव, फुलेनगर आदी परिसरात अनियमित पुरवठा करण्यात येत असल्याने महिलांप्रमाणे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईच्या समस्येबाबत वारंवार आंदोलने केली, त्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो, मात्र नंतर परिस्थिती जैसे थे, या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नसेल तर एमआयडीसीकडे पाणीपुरवठा सोपवावा, सोबतच पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला. आज मोर्चा निघणार म्हणून सकाळीच पाणीपुरवठा सुरू कसा केला, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. यावेळी ब्लॉक अध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेश पाटील, मिलिंद पाटील, पंकज पाटील, चरण रसाळ, विलास जोशी आदींच्या उपस्थितीमध्ये पाणी खात्याचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांची भेट घेत पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी, अशी मागणी केली.
पाणीटंचाई भेडसावणाऱ्या भागात तांत्रिक सुधारणा करण्याचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठ्यात सुधारणा करू.
- मिलिंद बसनगार, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ
----
मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या उन्हाचे प्रमाण वाढले असल्याने आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांनी छत्री घेऊन यावे, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते.