यंदा पावसाळ्यात पश्चिम रेल्वेची लोकल सुसाट

यंदा पावसाळ्यात पश्चिम रेल्वेची लोकल सुसाट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : पावसाळ्यात पश्चिम रेल्वे मार्गाच्या नालासोपारा, वसई-विरार रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचत असल्‍याने लोकल सेवा वारंवार ठप्प पडतात. तसेच रेल्वेचा वेग सुद्धा मंदावतो. ही समस्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यावर तोडगा म्हणून पश्चिम रेल्वेने अत्याधुनिक मायक्रो-टनेलिंग पद्धतीने पाच पर्जन्यवाहिन्या तयार केल्या आहेत. त्‍याचबरोबर नुकतेच आणखी दोन जलमार्गही कार्यान्वित करण्यात आले असून, अतिरिक्त पाच मायक्रो टनेलिंगचे काम या वर्षी पूर्ण करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

मुंबई उपनगरात दरवर्षी विक्रमी पाऊस कोसळतो. भर पावसातच समुद्राला आलेल्या भरतीमुळे काही कालावधीत मुंबईच्या सखल भागात पाणी साचते आणि मुंबईची तुंबई होते. या पार्श्वभूमीवर रेल्वेने विरार, नालासोपारा, वसई, बोरिवली आणि वांद्रे स्थानकांवर अत्याधुनिक मायक्रो-टनेलिंग पद्धतीने पर्जन्यवाहिन्या तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोरोनामुळे हे काम काही कालावधीसाठी रखडले होते. मात्र, कोरोनानंतर पाचही मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण झाले.
----------------------
पूरस्‍थिती कमी होण्‍यास मदत
नुकताच वांद्रे टर्मिनस स्टेशन यार्ड ते चमडावाडी नाल्यापर्यंत मायक्रो टनेलिंग करण्यात आले आहे; यामुळे यार्डमध्ये साचणारे पाणी नाल्यात सोडणे शक्य झाले आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड ते नालासोपारा स्थानकांदरम्यान पूल क्रमांक ७८ वर मायक्रो-टनेलिंग पद्धतीने पर्जन्यवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले आहे. १८०० मिमी व्यासाचे तीन पाईप मायक्रो-टनेलिंग पद्धतीने टाकण्यात आले आहेत. अंचोली नाल्यावरील हा निगेटिव्ह फ्री बोर्ड वसई परिसरात अतिवृष्टीसह भरतीच्या वेळी पाण्याचा जलद निकामी करण्यास उपयुक्त ठरणार आहे. तसेच, यामुळे वसई यार्डातील पूरस्थिती कमी होण्यास मदत होणार आहे.
-------------------------
दोन जलवाहिन्यांचे काम प्रगतिपथावर
गोरेगाव यार्डातील ५४ क्रमांकाच्या पुलाला समांतर १८०० मिमी व्यासाचे दोन पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम २३ मार्च रोजी पूर्ण झाले असून, यामुळे कल्व्हर्ट क्रमांक ५४ ची विसर्जन क्षमता वाढण्यास आणि गोरेगाव यार्डातील पुराची समस्या कमी होण्यास मदत होईल. याशिवाय असे आणखी पाच जलमार्ग बांधण्यात येत आहेत. यापैकी दोन जलवाहिन्यांचे काम प्रगतिपथावर असून, ते पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित तीन जलवाहिन्यांचे काम या वर्षी पूर्ण होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com