
चिमुकले पाऊल पडते पुढे.......
भगवान खैरनार, मोखाडा
आदिवासी भागातील निरक्षरतेचे प्रमाण कमी व्हावे म्हणून शासन विविध उपाययोजना करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, त्याला शिक्षणाची गोडी लागावी म्हणून पालघर जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत, त्यांना खाऊ, खेळणी देऊन प्रवेश मोहीम राबवली. मोखाड्यात ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी शिक्षक, स्थानिक व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, जिल्ह्याचे आणि तालुक्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी हजेरी लावत पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. यावेळी या चिमुकल्यांचे शैक्षणिक प्रवाहात पहिले पाऊल पुढे पडले आहे.
मोखाड्यातील राजेवाडी येथील प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश मेळावा कार्यक्रमात सजवलेल्या गाडीत व घोड्यावर मुलांची मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम सुरू असताना पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी येथे भेट दिली. यावेळी शिंदे यांनी मुलांना पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहीत केले. शाळेत दाखल झालेल्या मुलांशी संवाद साधला. त्यानंतर शाळेतील विविध उपक्रम, परसबाग, स्वच्छता पाहून शाळेला रोख बक्षीस देऊन मुख्यध्यापक रवींद्र विशे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी कुलदीप जाधव यांच्यासह तालुक्याचे अधिकारी व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील आणि नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत पहिली च्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पहिली इयत्तेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा फुल देऊन, औक्षण करून स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फुगे, टोप्या, फुले, खाऊ चे वाटप करुन चिमुकल्या पाऊल शाळेत पडण्यापुर्वी प्रथम पावलांचे ठसे कागदावर घेतले व त्यांचे वाजत, गाजत शाळेत स्वागत केले आहे. या अनोख्या पद्धतीने स्वागत केल्या मुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष तथा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी सर्व पालकांना मार्गदर्शन केले व नवीन विद्यार्थ्यांचे फुले व पुस्तके देउन स्वागत केले.
....
मोखाडा : वाकडपाडा शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ, फुगे, देऊन वाजत गाजवत मुलांचे स्वागत करण्यात आले. तेथे चिमुकल्या पायांचे ठसे घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला.