चहा प्या.. ताजे व्हा!

चहा प्या.. ताजे व्हा!

जागतिक चहा दिन


वैभव शिंदे, नेरूळ
‘सकाळची न्याहारी आणि चहाची प्याली’ असे समीकरण असते. बहुसंख्य भारतीयांची सकाळ तर चहानेच सुरू होते. वाफळत्या चहाने सकाळची सुरुवात झाली की, आळस चुटकीसारखा दूर होतो. संपूर्ण जगात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायले जाणारे पेय म्हटले तर चहाच असेल. याच चहाचा २१ मे हा खास दिवस आहे. जागतिक चहा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आज जगभरात जागतिक चहा दिन चहाप्रेमी साजरा करत आहेत. दैनंदिन जीवनात चहाचे महत्त्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवसाचा उद्देश चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या नैतिक व टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे.

आपल्या देशात घरी आलेल्या पाहुण्यांना गरमागरम चहा दिला जातो. मित्र, पाहुणे यांच्याबरोबर चहाचे घोट घेत छान गप्पा रंगतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही चहाची तल्लफ आली की लगेच चहा पिणारे शौकीन आहेत. अशा काही लोकांना कडक उन्हातही इतर थंडगार पेयाऐवजी चहा प्यायला आवडतो. पावसाळ्यात हा चहा पीत खिडकीतून पडणारा पाऊस बघण्याची मज्जा काही औरच असते. आता तर या चहाची अनेक रूपे पाहायला मिळत आहे. कडक चहा, कटिंग चाय, ग्रीन टी, हर्बल टी, तंदूर चाय असे अनेक प्रकार आहेत. चहा पिताच आळस, मळमळ दूर होऊन एक तरतरी येते. असेच चहाच्या विविध प्रकार जाणून घेऊयात.

इतिहास
चीन, भारत, केनिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका हे जगातील प्रमुख चहा उत्पादक देश आहेत. या व्यतिरिक्त टांझानिया, बांग्लादेश, यूगांडा, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशातही चहाचे उत्पादन घेतले जाते. भारताने २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवायचा प्रस्ताव दिला. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने यावर अनेक देशांचा विचार घेऊन २१ मे हा जागतिक चहा दिवस साजरा करावा, असा निर्णय घेतला.

चहाचे प्रकार
काश्मिरी कहवा : सुरुवातीला केशरचे दोन स्ट्रॅंड्स कोमट पाण्यात घालून ठेवा. यानंतर उकळत्या चहामध्ये काश्मिरी चहाची पाने, लवंगा, वेलची, दालचिनी, मिरपूड इ. घाला आणि ३-४ मिनिटे उकळवा. यानंतर चहा गाळून घ्या. त्यामध्ये केशरचे पाणी मिसळा आणि सर्व्ह करा.

गुळाचा चहा : हा चहा बनवण्यासाठी साखरेऐवजी गूळ वापरावा लागतो. गूळ अगदी शेवटी टाका. त्यानंतर जास्त चहा उकळण्याची गरज नाही. गूळ थोडासा क्रश करा म्हणजे तो चहामध्ये चांगला मिसळा.

मसाला चहा : मसाला चहाची पूड किंवा बडीशेप, वेलची, लवंग, दालचिनी, आले, काळी मिरी आदी साहित्याची अर्धा चमचा पावडर घ्यायची. दूध उकळल्यानंतर त्यात मसाला घाला आणि थोडे उकळवा.

रोंगा साह चहा : या चहामध्ये स्पेशल रोंगा साह आसामी चहाची पाने वापरली जातात. तरच त्याचा रंग लाल होतो. ते दुधाशिवाय बनवा आणि चहाच्या पानांचा रंग प्रथम लाल होईपर्यंत उकळावा, नंतर त्यात साखर, तुळस वगैरे घाला.

सुलेमानी चहा : या चहामध्ये १.५ इंची दालचिनी स्टिक, पुदीनाची दोन पाने, ५-५ लवंगा आणि वेलची, १ चमचे साखर घ्या. चहापत्ती टाका ते उकळवा. तसेच साखरेऐवजी मध किंवा गूळ वापरू शकता.

बदाम पिस्ता चहा : पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकतात. उकळी आल्यावर केशर टाकतात. एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला. साखर घालून पुन्हा उकळतात. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम
आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्या.

ईराणी चहा : हा प्रकार सर्वांना आवडीचा आहे. जाड बूड असलेल्या भांड्यात दूध घट्ट आणि मलई फुटेल इतके गरम करतात. वेगळ्या भांड्यात पाणी, साखर आणि चहा पाने उकळवून घ्यायची. भांडे झाकणाने बंद करून त्यावर कपडा गुंडाळतात. चहा कपात घेऊन घट्ट केलेले दूध टाकतात. भरपूर ढवळून प्यायला देतात. मुंबईत प्रत्येक कोपऱ्यावर ईराणी हॉटेलमध्ये हा चहा प्यायला मिळतो. उस्मानिया बिस्किटाबरोबर किंवा बनमस्का, टोस्टबटरबरोबर हा चहा उत्तम लागतो.

तंदुरी चहा : चुलीवर मातीचे भांडे ठेवतात. पाणी गरम करून आले, वेलची, दालचिनी, साखर आणि चहाची पाने टाकून चहा बनवून घेतात. पाणी उकळायला लागल्यावर लगेच दूध टाकतात आणि पुन्हा दोन मिनिटे उकळत ठेवतात. मोठ्या भांड्यात गरम केलेले मातीचे भांडे ठेवतात. मातीच्या भांड्यात तयार केलेला चहा ओततात. थोड्या वेळात चहा फसफसून बाहेर यायला लागला की, तो दुसऱ्या मातीच्या भांड्यात ओततात. हा चहा दिल्ली व आजुबाजूच्या प्रदेशात फारच प्रसिद्ध आहे.

लिंबू चहा : शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम प्रकार म्हणजे लिंबू चहा. यात चहापत्ती, थोडी साखर, लिंबाचा तुकडा पाण्यात उकळा. त्यावर पुदीनाची पाने टाकून त्याचा आनंद घ्या.

चॉकलेट चहा : प्रथम पातेल्यात दूध आणि अर्धा कप पाणी टाकून गॅसवर ठेवावे. त्यात लवंग, दालचिनी, वेलची, साखर, चहा पावडर घालून उकळून घ्यावे. मग त्यात कोको पावडर टाकून परत एक उकळी काढावी. चॉकलेट हा सर्वांचा आवडीचा विषय असल्यामुळे तरुण वर्गामध्ये सध्या या चहाला पसंती आहे.

गुलाबी चहा : पाण्यात चहा पावडर घालून उकळी येऊ द्या. त्यानंतर बेकिंग सोडा घालून ढवळत राहा. यात वेलची पावडर घालून लाल रंग येईपर्यंत उकळी येऊ द्या. मग यामध्ये दूध घाला. यानंतर गॅस बंद करून थोडे मीठ घाला. यामध्ये सुकामेवा काही ठिकाणी घातला जातो. गुलाबी रंगाचा चहा पाहून प्रत्येक जण या चहाच्या प्रेमात पडतात.

दम चहा : हा चहा मंद आचेवर तयार करतात. याची चव अप्रतिम लागते. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दूध घ्या आणि दुसऱ्या पातेल्यात तीन कप पाणी, तीन चमचे चहाची पाने आणि तीन छोटी वेलची पाण्यात टाकून ३० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. दुसरीकडे दूध मंद आचेवर शिजवून घ्या. दुधात क्रीम राहणार नाही, याची काळजी घ्यावी. हे दूध शिजलेल्या चहामध्ये टाकावे.

फायदे
कैफिन आणि टैनिनमुळे शरीराला स्फूर्ती मिळते
चहामध्ये एंटीजन असल्याने एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात.
अमिनो-ॲसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो.
फ्लोराईड हाडांना मजबूत आणि दातांना कीड लागण्यापासून थांबवतो.
चहा शरीरातील एंटी-ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो आणि अनेक आजारांना दूर ठेवतो.
गुळामध्ये पुष्कळ पोषक घटक असतात. आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यासाठी गुळाचा चहा उपयुक्त ठरतो.
काळा चहा मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त
रक्तदाब नियंत्रित, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत

तोटे
अति चहा पिणे हृदयाच्या आरोग्यास हानिकारक आहे.
अति सेवनाने आतड्यांवर परिणाम होतो.
जास्त प्रमाणामुळे ॲसिडिटी होते.
निद्रानाश होते. पोटाच्या आजारास कारणीभूत
ब्लड प्रेशर वाढते.
अति सेवनाने पोटात ॲसिड तयार होऊन अल्सर वाढवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com