
मुलुंडमध्ये वसंत व्याख्यानमाला
मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ संचालित मुलुंड पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, ग. क. खांडेकर वाचनालय आणि मराठा मंडळ संचालित सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसंत व्याख्यानमाला’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष असून ४ ते ७ मेदरम्यान रोज संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहामध्ये होणार आहे.
गुरुवारी (ता. ४) कवयित्री नीरजा यांचे ‘स्व कडून सार्वत्रिकाकडे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. नीरजा यांनी कविता, कथा आणि कादंबरी असे विविध साहित्य प्रकार हाताळले आहेत. त्या त्यांचा साहित्यिक प्रवास यानिमित्ताने उलगडून दाखवणार आहेत.
शुक्रवारी (ता. ५) ‘शोध प्राचीन मुंबई समृद्धीचा’ या विषयावर व्याख्यान होणार असून यानिमित्ताने ख्रिस्तपूर्व काळापासूनचा मुंबईचा आणि आता मुंबईची उपनगरे असलेल्या मुलुंड, नाहूर, भांडुपचा इतिहास ज्येष्ठ लेखक आणि इतिहास संशोधक विनायक परब उपस्थितांसमोर मांडणार आहेत.
शनिवारी (ता. ६) वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि क्विक रिस्पॉन्स टीमचे प्रमुख राजू आनंद पाटील यांचे ‘समाजभान जपणारा वर्दीतील अधिकारी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विशेष म्हणजे राजू आनंद पाटील हे याआधी एटीएसमध्ये कार्यरत होते. आपल्या दीर्घ सेवेत त्यांनी अनेक आव्हानात्मक प्रसंग हाताळले आहेत. गिर्यारोहण हा त्यांचा आवडीचा छंद आहे. सेवा संघाच्या प्रतिवर्षी होणाऱ्या गिरिमित्र संमेलनाला ते आवर्जून उपस्थित असतात. ते या वसंत व्याख्यानमालेत आपले विचार व्यक्त करणार आहेत.
रविवारी (ता. ७) चित्रपट लेखक गणेश मतकरी यांचे ‘चित्रपट कसा पाहावा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. एखादा चित्रपट सर्वांगाने कसा पाहावा, त्याचा आस्वाद कसा घ्यावा, हे गणेश मतकरी उपस्थितांना सांगणार आहेत.
कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून सर्व नागरिकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.