
बेकायदा वास्तव्य करणारे दोन बांग्लादेशी अटकेत
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : खारघरमधील कोपरा गावात बेकायदा वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने अटक केली आहे. हे दोघेही बांगलादेशी नागरिक मागील २० वर्षांपासून खारघर भागात राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दहशतवादविरोधी पथकाने या दोघा बांगलादेशी नागरिकांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश) व विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याविरोधात पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
मूळचा बांगलादेशी नागरिक असलेल्या मोहम्मद खैरुल इस्लाम अक्षीर शेख याला पश्चिम बंगाल पोलिसांनी गेल्या मार्च महिन्यात मनी लॉण्डरिंग प्रकणात सहभाग असल्याच्या कारणावरून तसेच जेएमबी, एक्यू या संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरून अटक केली होती. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता खैरुल शेख हा खारघरमधील कोपरा गावात राहणाऱ्या कबीर शेख याच्या संपर्कात असल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून बांगलादेशी नागरिक असलेले कबीर आलम (आकशीर) शेख (३१) व शरीफ शफिकुल शेख (२३) हे दोघेही खारघरमध्ये अवैधरीत्या राहत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने कोपरा गावात कबीर आणि शरीफ शेख या दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.