
मुंबईत पाच हजार ठिकाणी ‘मन की बात’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या पर्वासाठी मुंबई भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यानिमित्त मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील पाच हजारांहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रसारण रविवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली.
१०० व्या पर्वानिमित्त भाजप खासदार, आमदार आणि पदाधिकारी मुंबईत ठिकठिकाणी आपापल्या विभागातील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व ३६ विधानसभेत प्रत्येकी १०० कार्यक्रम निश्चित केले आहेत; तर पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मुंबई महिला कारागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचत गट तसेच गृहउद्योगातील महिला, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, मुस्लिम महिला, रिक्षाचालकांना कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे.
ओबीसी मोर्चाच्या वतीने ५० चहाच्या स्टॉलवर मोफत चहा वितरण करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने शीर खुर्माचा बेत करत प्रमुख दर्गा, मदरसा आणि ऊर्दू शाळांमध्ये कार्यक्रम होईल. मुंबईतील डबेवाल्यांसाठीही कार्यक्रम घेण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्र दालनात कामगार आघाडीचा विशेष कार्यक्रम होईल, अशी माहिती शेलार यांनी दिली.
२३ कोटी नियमित श्रोते
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहवालानुसार ‘मन की बात’ १०० कोटी श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहे. या कार्यक्रमाचे २३ कोटी नियमित श्रोते आहेत. ९६ टक्के लोकांना या कार्यक्रमाबाबत माहिती आहे. देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा सन्मानदेखील या माध्यमातून करण्यात आला आहे.