पावणे औद्योगिक वसाहतीमधील भंगार गोदामाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावणे औद्योगिक वसाहतीमधील भंगार गोदामाला आग
पावणे औद्योगिक वसाहतीमधील भंगार गोदामाला आग

पावणे औद्योगिक वसाहतीमधील भंगार गोदामाला आग

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर): पावणे औद्योगिक वसाहतीमधील सी-१२६ व १२७ या भूखंडावर असलेल्या कलर कंपनीच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी पाच वाजण्‍याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र या गोदामात असलेले भंगाराचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. एमआयडीसी व महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही.
पावणे एमआयडीसीतील कलर कंपनीचे तेथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या खालीच गोदाम असून, या गोदामाला शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकलचे रिकामे ड्रम व इतर भंगार साहित्य ठेवण्यात आल्याने आग झपाट्याने सर्वत्र पसरली. या आगीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्‍थळी धाव घेतली. मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने त्याठिकाणी महापालिकेच्या वाशी, कोपरखैरणे, नेरुळ येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दल जवानांनी तीन तासापेक्षा अधिक काळ अथक प्रयत्न करून येथील आग आटोक्यात आणली. त्यानंतर जवानांकडून त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत कुलींगचे काम सुरू होते. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या आगीची नोंद घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.