भाईंदर, मिरा रोडला मिळणार सुसज्ज बसस्थानक

भाईंदर, मिरा रोडला मिळणार सुसज्ज बसस्थानक

भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : भाईंदर पश्चिम तसेच मिरा रोड येथे प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने पावले उचलली आहेत. या दोन्ही ठिकाणी रेल्वे स्थानकाजवळ सुसज्ज असे बसस्थानक उभारण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रकल्प अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.
भाईंदर पश्चिम येथे राज्य परिवहन महामंडळाची बसडेपोची जागा आरक्षित आहे, पण या ठिकाणी सीआरझेड आणि कांदळवनामुळे महामंडळाने या जागेवर डेपो बांधलेला नाही. परिणामी महामंडळाच्या बस सध्या रस्त्यावरच उभ्या राहतात. त्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांचे खूपच हाल होतात. महामंडळाप्रमाणे मिरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बससाठीदेखील या ठिकाणी जागा नाही. त्यामुळे त्या बसदेखील रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात. त्यामुळे महापालिकेच्या व महामंडळाच्या बससाठी डेपोची आवश्यकता आहे. महापालिकेने महामंडळाची बसडेपोची जागा मिळावी अशी विनंती सरकारकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत महामंडळाची जागा महापालिकेने विकसित करावी व त्या ठिकाणी दोन्ही उपक्रमांच्या बस उभ्या करण्याची व्यवस्था करावी असे निर्देश दिले होते.
बैठकीत ठरल्यानुसार महापालिकेने या जागेवर असलेला कांदळवन व सीआरझेड परिसर वगळून उर्वरित सुमारे दोन हेक्टर जागेवर बस डेपो बांधण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या ठिकाणी दहा माळ्याची इमारत बांधण्यात येणार असून तळमजल्यावर दोन्ही उपक्रमाच्या २३ बस उभ्या करण्यासाठी जागा, आरटीओ उपकेंद्र तसेच इमारतीमध्ये दोन्ही परिवहन सेवेची कार्यालये व व्यावसायिक कार्यालये बांधण्यात येणार आहेत. यासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मिरा रोड येथेही हीच परिस्थिती आहे. मिरा रोड रेल्वेस्थानकाबाहेर बसडेपोचे आरक्षण आहे. परंतु त्या ठिकाणी मासळी बाजार तसेच अन्य बाजार आहेत. त्यामुळे ही जागा विकसित झालेली नाही. मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरून बस पकडण्यासाठी वसई-विरारहूनदेखील प्रवासी येत असतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी असते. या प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेने बसडेपोचे आरक्षण असलेली जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदर २८ हजार चौ मी. क्षेत्रफळाच्या या जागेवर दहा बस उभ्या करण्यासाठी जागा, मासळी तसेच भाजी बाजार तसेच चार मजली इमारतीत परिवहन व व्यावसायिक कार्यालये बांधण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
.....
निधी मिळवण्यासाठी प्रयत्न
एकत्रीकृत विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार हे दोन्ही बस डेपो विकसित करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच डेपो उभारणीसाठी लागणारा निधी राज्य सरकारकडून मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com