उन्हाळी पर्यटनाला बहर

उन्हाळी पर्यटनाला बहर

उन्हाळी पर्यटनाला बहर
समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० : शाळा, महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. त्‍यातच सरकारी कार्यालयांना शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टी मिळाली आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्‍येने बाहेर पडले असून त्‍यांची पावले रायगड जिल्‍ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. त्‍यामुळे येथील समुद्रकिनारे, थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान पर्यटकांनी गजबजले आहे.
पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत बहुतांश चाकरमानी गावाकडे येत असतात. त्‍यातच आता पर्यटकांचीही पावले रायगडमधील पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि माथेरान या पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे.

मुंबईकरांचा ओघ वाढला
विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा, वनराई, गडकिल्ले, लेणी याचे मुंबईकरांना नेहमीच अप्रूप राहिले आहे. त्‍यामुळे या वेळी मिळालेल्‍या सलग सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईतील नागरिकांचा ओघ रायगड जिल्ह्यात वाढल्याचे दिसते.

समुद्र किनाऱ्यावर गर्दी
उन्हाचा काहीली पासून दिलासा मिळण्यासाठी पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद लुटताना दिसत आहेत. प्रशासकीय आकडेवारीनुसार काशिद समुद्रकिनारी दीड हजार पर्यटक रविवारी दुपारी उपस्थित होते. सायंकाळी ही संख्या वाढत गेली. दिवेआगर, मुरूड, वरसोली, मांडवा येथेही समुद्रस्नानासाठी पर्यटक हजर होते.

पावसाळी बेगमीची खरेदी
कोकणात सुकी मासळी, बेगमी, कडधान्य, पापड, सरबत, आंबे चांगल्या दर्जाचे मिळतात. येणाऱ्या पर्यटकांकडून या पदार्थांना चांगली मागणी आहे. या उद्योगाशी येथील बहुतांश कुटुंबे गुतलेले आहेत. या पदार्थांच्या विक्रीतून या कुटुबांना आर्थिक फायदा होत असतो. उन्हाळी पर्यटनामुळे आर्थिक उलाढालीला वेग आला आहे.

हॉटेल झाली फुल्ल
रायगड जिल्‍ह्यात पर्यटकांची गर्दी झाल्‍याने येथील हॉटेलचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्‍यामुळे हॉटेल व्‍यावसायिक आनंदात आहेत. पर्यटक एसी रूमला अधिक पसंती देत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

उन्हाळी पर्यटनासाठी कोकणसारखा पर्याय नाही. आमचे कोकणात कोणीही नातेवाईक नाहीत किंवा घरही नाही. ही कसर भरून काढण्यासाठी आम्ही दर वर्षी कोकणातील वेगेवेगळ्या पर्यटन स्थळांवर जात असतो. या वर्षी वरसोली येथे आलो आहोत. यंदाच्या कडकडीत उन्हाळ्यात येथील समुद्रात पोहण्याची मजा अवर्णनीय आहे.
- सिद्धार्थ महापती, पर्यटक

मुंबई, पुण्यातील पर्यटकांना येथील सफेद कांदा, आंबा, कोकम यांसारख्या फळांचे मोठे आकर्षण आहे. उन्हाळ्यात शेतात तयार झालेली पिक किंवा फळे व्यापाऱ्याला विकावी लागत नाहीत. पर्यटक म्हणून आलेले ग्राहक दारात येऊन खरेदी करतात. हे ग्राहक सर्व प्रकारच्या फळांची मागणी करीत असतात, त्यामुळे यातून येथील शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.
- शांताराम पाटील, शेतकरी, अलिबाग

एक्‍स्‍प्रेस वेवर वाहनांच्या रांगा
खंडाळा घाट क्षेत्रात वाहतूक कोंडी
खोपोली, ता. ३० (बातमीदार) ः सलग तीन दिवस आलेल्‍या शासकीय सुट्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांनाही सुट्टी मिळाली आहे व त्यातच लग्नसराई सुरू आहे. त्‍यामुळे नागरिक मोठ्या संख्‍येने बाहेर पडले असून याचा परिणाम वाहतूक व्‍यवस्‍थेवर झाल्‍याचे दिसून येत आहे. एक्‍स्‍प्रेस वे वर खालापूर टोल नाका ते खंडाळा घाट, मुंबई–पुणे जुना महामार्गावर शीळफाटा ते खोपोली घाट रस्ता, खोपोली–पेण रस्त्यावर पाली फाटा आदी ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. द्रुतगती मार्गावरील अंडा पॉईंटवर विविध ठिकाणी गाड्या बंद पडल्याने रविवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आडोशी ते खंडाळा प्रवेशपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
खोपोली पोलिस, महामार्ग वाहतूक पोलिस व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्‍न केले. त्‍यांची एक टीम शिळफाटा, एक टीम अंडा पॉईंट व सायमाळ उतारावर तैनात करण्यात आली. येथून वाहनांना शिस्तीने एकापाठोपाठ एक सोडले जात होते. या वेळी अवजड वाहनांना काही वेळासाठी बाजूला करत ही वाहतूक कोंडी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सामान्य झाली.
यासाठी महामार्ग वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक योगेश भोसले, खोपोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली टीमने चार-पाच तास मोठी मेहनत घेतली.

अपघाताची घटना
वाहतूक कोंडीदरम्‍यान सायमाळ उतार, अंडा पॉईंट उतार, खोपोली एक्झिट या ठिकाणी काही गाड्या रस्त्याच्या खाली उतरल्‍याने किरकोळ अपघात घडले. यामध्‍ये चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. या ठिकाणी पोलिस व वाहतूक यंत्रणेकडून तातडीने मदत करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com