
विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर मिरवणुकीतून स्वागत
जव्हार, ता. ३० (बातमीदार) : तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा धानोशी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या नवविद्यार्थ्यांची शाळेतले पहिले पाऊल या उपक्रमांतर्गत ट्रॅक्टर सजावट करून वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. येथील शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व नवागतांचे, मातांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक चंदनसिंग जगताप यांनी पुष्प देऊन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मालती मुऱ्हा, उपसरपंच भगवान पालवी व ज्येष्ठ नागरिक हनुमंत झुरडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हरिराम धोंडी व धानोशीच्या ग्रामपंचायत सदस्या ज्योती घेगड उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षण विस्तार अधिकारी आशालता थोरात व केंद्रप्रमुख अनंता महाले या सर्वांचे विशेष मार्गदर्शन लाभले.