
निवडणुकाचा चिकूला फटका
बोर्डी, ता. ३० (बातमीदार) : उत्तर भारतात विविध राज्यांमध्ये ग्रामपंचायती, नगरपंचायती व नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील चिकू फळे दिल्लीच्या बाजारपेठेत पाठवून नयेत, अशा सूचना तेथील व्यापाऱ्यांनी डहाणू व गुजरात राज्यातील व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. डहाणू आणि गुजरात राज्यांतील बलसाड जिल्ह्यातील चिकू फळे मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशात विक्रीसाठी पाठविली जातात. दिल्ली येथील मुख्य मार्केटमध्ये फळे पाठवल्यानंतर तेथील व्यापारी इतर भागांमध्ये या फळांचे वितरण करीत असतात; मात्र सध्या उत्तर भारतातील निवडणुकांमुळे बाजारभाव एकदमच पडले आहेत, असे कारण सांगून उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी चिकू खरेदी करणे बंद केले आहे. याचा फटका येथील स्थानिक शेतकऱ्यांना बसला आहे. चिकू खरेदी बंद केल्यामुळे झाडावरील चिकू पिकून नाश पावत आहेत. तसेच मागच्या महिनाभरापासून बाजारभावानेही शेतकऱ्याला चिंतेत टाकले आहे. उत्तर भारतात फळे पाठवली जात नसल्यामुळे मुंबईच्या बाजारपेठेतदेखील मंदीचे सावट पसरले आहे, त्यामुळे चिकू बागायतदार हतबल झाले आहेत.