
हल्लाप्रकरणी तीन रिक्षाचालकांची निर्दोष सुटका
ठाणे, ता. ३० (वार्ताहर) : सभेत दंगा करत सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिरारोड येथील तीन रिक्षाचालकांना ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
अनिलकुमार अनंतराम निर्मल (वय ३६), शिवबंस ऊर्फ शिवप्रसाद सीताराम (वय ५७) आणि सुनील रामस्वरूप शर्मा (४६) या रिक्षाचालकांनी ११ ऑक्टोबर, २०१२ रोजी धारदार शस्त्राने सामाजिक कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्यासाठी हल्ला केला होता. या प्रकरणी या तिघा रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करत सदर खटला न्यायालयात सुरू होता. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादा हे मिरा रोड परिसरातील रिक्षा प्रवाशांच्या प्रश्नांवर आवाज उठवतात. परिणामी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. न्यायालयात राकेश सरावेगी यांनी नोंदवलेल्या साक्षीत घटनेच्या दिवशी जमाव जमल्याने हल्ला झाला; मात्र आरोपीला कोणीही ओळखले नाही. त्यानंतर इतर दोन साक्षीदार आणि घटनास्थळाचे पंच यांनी आरोपीला ओळखले नाही; तसेच पंचनामादेखील पोलिस ठाण्यात घेतल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. सरकारी पक्षाला संशयित आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यासाठी अपयश आले. विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. अतिरिक्त ठाणे सत्र न्यायालयाचे न्या. अमित एम. शेटे यांनी सबळ पुराव्याच्या अभावी तिन्ही रिक्षाचालकांची निर्दोष मुक्तता केली.