पाण्याची झळ

पाण्याची झळ

टेस्ट ड्राईव्ह
ठाणे, ता. ३० : १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन... तमाम महाराष्ट्रीय मनासाठी स्वाभिमानाचा दिवस... या महाराष्ट्र दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र आहे; पण असे असले, तरी मुंबईला खेटून असलेल्या ठाणे जिल्ह्यात असे अनेक गाव-पाडे आहेत, जिथे सध्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. डोक्यावर सूर्य आग ओकत असतानाही शेकडो भगिनी या तळपत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी अनेक मैल पायपीट करत आहेत. काय आहेत त्यांच्या व्यथा... कशी आहे या गावपाड्यांची स्थिती... यावर ‘टीम सकाळ’ने केलेला हा टेस्ट ड्राईव्ह.
........
ग्रामीण भागाचा टँकरचा फेरा सुटेना
शहापुरातील २७ गावे, १२४ पाडे तहानलेले
राहुल क्षीरसागर, ठाणे
धरण उशाला... कोरड घशाला... अशीच अवस्था सध्या शहापूर तालुक्याची झाली आहे. मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी मोठी धरणे असलेला हा तालुका सध्या पाण्यासाठी धडपडत आहे. येथील २७ गावे आणि १२४ पाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून येथील रहिवाशांची तहान भागवण्यासाठी ३० टँकरचा फेरा सुरू झाला आहे; पण टँकरने होणारा पुरवठा तोकडा भासत असून ते पाणी ‘पचनी’ पडत नसल्याने येथील महिला पाण्यासाठी नैसर्गिक स्रोताच्या शोधात भटकत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात वस्ती असलेल्या गावांची संख्या ८०७ आहे; तर एक हजार ९७५ पाडे आहेत. यातील २८४ गावे आणि ५१४ गावांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यामध्ये शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नळजोडण्या, विहिरी, कूपनलिका, कृत्रिम तलावासारख्या योजना आखण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी या योजना रखडल्याने नारिकांच्या नशिबी आजही पाणीटंचाईची झळ कायम आहे. यात भर म्हणून जेथे या योजना सुरू आहेत, तिथे यंदाच्या कडक उन्हामुळे पाणी आटले आहे. त्यामुळे सध्या या सर्वच गावपाड्यांची भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे. दिवसातून किंवा दोन दिवसांमधून टँकर गावात पोहचतो. तंटा टाळण्यासाठी हे पाणी थेट विहिरीत किंवा सिन्टेक्सच्या टाकीत भरले जाते. तेथून याचा गावांना पुरवठा होतो. त्यामुळे घरात नळ असला, तरी डोक्यावरचा हंडा मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे.
टँकरने होणारा पाणीपुरवठा येथील रहिवासी बहुतेकदा घरकामासाठी आणि दैनंदिन स्वच्छतेसाठी करत असल्याचे दिसून आले आहे. ‘अंधश्रद्धा’ म्हणा किंवा चवीचा फरक म्हणा टँकरच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी फार क्वचितच होतो. कूपनलिका आणि नदी-ओढ्यांमधील क्षारयुक्त पाण्याची येथील रहिवाशांना सवय झाली आहे. त्यामुळे ‘ताजे’ पाणी मिळविण्यासाठी महिला पहाटेपासूनच जंगल, दरीचा रस्ता धरतात. डोक्यावर तीन-चार हंडे, पाणी भरण्यासाठी वाटी किंवा घमेले, तर कधी शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांचाही वापर होतो. शहापूर तालुक्यातील वासिंद या गावामध्ये हीच परिस्थिती आहे. डोक्यावर हंडा, कडेवर चिमुकला... कधीकधी घरातील ज्येष्ठ मंडळीही या मोहिमेत सहभागी होतात. जंगलातून जाणारी पायवाट तुडवत ही मंडळी पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत असल्याचे अनेक गावांमध्ये दिसून येते.
टंचाईची कारणे
ठाणे जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते. असे असले तरी शहापूर तालुक्यातील अजून माळ, दापूर, कसारा खुर्द, बिबळवाडी, नारळवाडी यांसारख्या शेकडो गावपाड्यांवर आजही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात खडक असल्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्‍या पावसाचे पाणी हे तेथील जमिनीत न झिरपता वाहून जात असते. त्यामुळे या ठिकाणी शाश्वत पाण्याची योजना राबवणे गरजेचे असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यक्त केले जात आहे

जलजीवन मिशन वरदान ठरेल
ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत जलजीवन मिशन योजनेसह भावली धरण योजना आणि नळ पाणीपुरवठा पूरक नळ पाणीपुरवठा योजना आदी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याने तेथील टँकरची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. तसेच येत्या काही काळात या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथील पाणीटंचाईची समस्या निकाली निघण्यास मदत होऊन टँकर मुक्त होतील.
- अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा जि.प. ठाणे

डबक्यातील पाण्यासाठी उपासमार
नरेश जाधव, खर्डी
शहापूर तालुक्यातील सावरकुट, माळ, दापूर, भोसपाडा, तळवडा, कोठारे यांसारख्या ६० पाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यासाठी २६ टँकरने पाणीपुरवठा होत आहे; पण तो पाणीपुरवठा अपुरा ठरत आहे. त्यामुळे रहिवासी धरणालगत असलेल्या जमिनीत खड्डे खोदून पाणी नेत आहेत; पण डबक्यातील दूषित पाणी प्यावे लागत आहे; पण ही कसरत करताना बहुतेकदा रोजंदारीची कामे बुडतात. त्यामुळे पाण्यासाठी उपासमारीही या आदिवासी महिलांना सहन करावी लागत असल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.
डोळखांबजवळील तळवडा ग्रामअंतर्गत येणाऱ्‍या कसारा-डोळखांब रस्त्यावरील समाधानवाडी व रोडवाहल या ६०० च्या आसपास लोकवस्ती असलेल्या आदिवासी पाड्यात ७ विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. येथील पाच बोअरवेल बंद अवस्थेत असून एका बोअरवेलवर पाणीपुरवठा योजना राबविण्यात येते; परंतु ही योजना महावितरणच्या वीजजोडणीवर राबविण्यात येत असल्याने येथे ही योजना राम भरोसे झाली आहे. बोअरवेलला कमी प्रमाणात पाणी असल्याने येथे हंडाभर पाणी जमा होण्यासाठी तीन ते चार तास लागतात. त्यामुळे हे पाणी पुरेसे पडत नसल्याने येथे रोज टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिक महिला करीत आहेत.

भावली योजनेकडे डोळे
तालुक्यात भावली योजनेचे पाणी प्रस्तावित आहे. ठिकठिकाणी जलजीवन योजनेचे काम सुरू आहे; पण त्याला दोन ते तीन वर्षे लागणार असून भावली योजनेचे पाणी येईल की नाही, याबाबत जनता साशंकता व्यक्त करीत आहे.
.
गावातील सर्व विहिरी कोरड्या पडल्यात व सुरू असलेल्या बोअरवेलला पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाणी जमा होण्याची वाट पाहावी लागते. त्यासाठी दिवसभर उपाशीपोटी, पाणी मिळेल या आशेवर आम्ही पाण्याची वाट पाहत असतो. आम्हाला रोज टँकरने पाणीपुरवठा केल्यास पिण्याचे पाणी मिळेल, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- गिरिजा झुगरे, स्थानिक महिला, समाधानवाडी

येथील वस्तीत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असून बोअरवेल दुरुस्तीही करण्यात येईल.
- विजय जाधव, सहअभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर

खर्डी : समाधानवाडी येथील महिला पाण्याच्या प्रतीक्षेत बसल्या आहेत.
...............

मुरबाडही तहानलेला
मुरलीधर दळवी, मुरबाड
शहापूरपाठोपाठ टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये मुरबाडचा क्रमांक लागतो. या वर्षी मुरबाड तालुक्यात वीस गावे आणि पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यापैकी सहा गावे व सात पाड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून मंजुरी आली आहे. त्यामुळे चार टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तोंडली, सजाई व महाज येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आणखी एक टँकर मंजूर केला असल्याची माहिती मुरबाड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जगदीश बनकरी यांनी दिली.
तालुक्यात एकूण गावांच्या प्रमाणात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झालेल्या गावांची कागदोपत्री संख्या कमी दिसत असली, तरी या गावांपैकी बऱ्‍याच गावात दरवर्षी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. मुरबाडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वेहऱ्‍याची वाडीसारख्या आदिवासी वाडीला गावाच्या खालच्या बाजूला असलेल्या एका बोअरवेलवरून पाणी आणण्यासाठी तासन् तास ताटकळत राहावे लागते. त्यानंतर पाणी मिळाल्यावर एक मोठी दमछाक करणारी चढण चढून पिण्याचे पाणी घरी आणावे लागते. शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेल्या या गावामध्ये महिलांच्या डोक्यावरील हंडा अद्याप उतरलेला नाही; पण तरीही हे गाव कधी तक्रार करत नाही. बाराही महिने येथील महिलांची ही दमछाक सुरूच असते.
धक्कादायक म्हणजे वेहऱ्‍याची वाडी या गावाचे नाव पाणीटंचाई यादीमध्ये समाविष्ट नाही. फार पूर्वी कधी तरी एकदा आमच्या वाडीला टँकरद्वारे पाणी मिळाले होते, असे येथील नागरिक गुरुनाथ कातवारा यांनी सांगितले. पाणीटंचाई व्याख्येत न बसणारी वेहऱ्‍याची वाडीसारखी अनेक गावे आहेत.

अर्जांचा खच
मुरबाड तालुक्यातील मोहघर, शीलंद, तागवाडी, गुमाळवाडी, पांडूची वाडी, मेरदी, लोत्याची वाडी, देवापे, नंदेणी, देवगाव, कलंभाड, दुर्गापूर, वाघाची वाडी अशा वीस ठिकाणी सध्या पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे, असे अर्ज मुरबाड पंचायत समितीच्या कार्यालयात प्राप्त झाले आहेत.

योजना रखडल्या
मुरबाड तालुक्यात सुमारे १८९ पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनावर कोट्यवधी रुपये खर्च केला असला, तरी या योजनांची बऱ्‍याच ठिकाणी पडझड झालेली आहे. दारात नळ आले आहेत; परंतु पाण्याची बोंबाबोंब काही थांबलेली नाही. शासन पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवत असते; पण त्यासाठी येणारा पैसा नेमका कुठे जातो, हे शोधण्याची गरज आहे.

मुरबाड तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या टँकर मागणीचे प्रस्ताव कार्यालयाकडे येत आहेत. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
- जगदीश बनकरी, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

मुरबाड : वेहऱ्याची वाडी येथे बोअरवेलसभोवती पाणी भरण्यासाठी महिला बसल्या आहेत.
.....

तीर्थक्षेत्रे कासावीस
दीपक हिरे, वज्रेश्वरी
ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली ही तीर्थक्षेत्रेही पाणीटंचाईच्या ‘शापा’तून सुटलेली नाहीत. तीर्थक्षेत्रे परिसरातील नदी आटल्यामुळे त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने भातसा तलावमधून पाणी सोडून निदान पिण्यापुरते तरी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली या तीर्थक्षेत्र असलेल्या गावासाठी अकलोली येथे तानसा नदीकिनारी वज्रेश्वरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र या वर्षीचे तापमान वाढल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहेत. त्यात भर म्हणून परिसरात बडोदा मुंबई महामार्गचे जोरदार काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी तानसा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. परिणामी मे महिन्याआधीच तानसा नदीने तळ गाठला आहे. नदीमध्ये पाणीच नसल्याने येथील पाणीपुरवठा योजनेची जॅकवेलदेखील उघडे पडण्याच्या मार्गांवर आहेत.

रोगराई पसरण्याची भीती
सध्या पुरवठा होत असलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. साठवणुकीचे पाणीही संपले आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून येथील ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. दुसरीकडे तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्‍या भाविकांना दुकानातील विकतचे पाणी प्यावे लागत आहे.

पाण्याचे एटीएम
पाणीटंचाई काहीशी दूर करण्यासाठी वज्रेश्वरी, अकलोली ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचे छोटे एटीम मशीन बसविले. मात्र तेदेखील नदीच्या पाण्यावर आहे. तसेच या एटीएमचा अतिप्रमाणात वापर होत असल्याने ते कधीही बंद पडण्याची शक्यता आहे.

व्यवसायावरही परिणाम
पाण्याअभावी येथील हॉटेल आणि इतर व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा फरक पडला आहे. या ठिकाणी पुढील काही दिवसात भातसा कालवा किंवा लोहपे तलावातून पाणी न सोडल्यास येथील तिन्ही गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

अशी होऊ शकते पाणीटंचाई दूर
या भागातील तानसा नदीला जोडून अनेक नाले आहेत. त्यामध्ये सैतानी नदी ही तानसा नदीस मिळते. सैतानी नदीतून पाणी थेट तानसा नदी सोडल्यास येथील पाणीपुरवठा योजनेचा जेकवेल पाण्याखाली येऊन येथील पाणीटंचाई दूर होऊ शकते. यासाठी लोकप्रतिनिधी व शासन यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com