
२५ हेक्टरवरील अतिक्रमण जमीनदोस्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः बदलापूर वनपरिक्षेत्रातील अडिवली आणि ढोकळी परिसरातील २५ हेक्टरवरील बांधकाम वन विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आले आहे. हे बांधकाम अतिक्रमण करून केल्याचा आरोप वन विभागाने केला आहे. ग्रामीण भागात वन विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
अंबरनाथ तालुक्यातील आडिवली-ढोकळी परिसरात वन विभागाची जागा आहे. या जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण करीत बंगले आणि घरांचे बांधकाम केले होते. वन विभागाकडून वारंवार नोटिसा देऊनही भूमाफिया अतिक्रमण हटवण्यास तयार नव्हते. अखेर शुक्रवारी (ता. २८) वन विभागाने पोलिसांच्या मदतीने एक बांगला आणि काही घरे जमीनदोस्त केली आहेत. एका वर्षातील वन विभागाची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण पट्ट्यात वन विभागाच्या जमिनींवर झालेले अतिक्रमण हटवण्याचे काम सध्या वन विभागाकडून सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात वन विभागाने आडिवली-ढोकळीमधील अतिक्रमणांवर परिमंडळ ३ मधील पोलिस यंत्रणा घेऊन कारवाई केली जात आहे.
बदलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक नातू यांच्या आदेशानुसार वन विभागाचे अधिकारी वनपाल राठोड, आनंद पवार, जयश्री निर्डे, सविता मदंम, दीपाली पाटील, सागर कोदिंडीलकर, राजेश शेलार, नितेश भोईर, हरिभाऊ आणि आंभे परिमंडळ अधिकारी विठ्ठल दरेकर, रवींद्र पाटील, दीपाली पाटील, लक्ष्मण वणवे यांच्या पथकाने एका दिवसात ही कारवाई केली आहे. या ठिकाणी कच्ची पक्की बेकायदा बांधकाम करण्यात आलेली घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. भविष्यात या जागेत चांगला प्रकल्प निर्माण करण्याचा मानस वन विभागाने व्यक्त केला आहे. राजकीय दबाव बाजूला सारत वन विभागाने ही मोठी कारवाई केल्याचे बोलले जात आहे.