ठाण्यातील विकासकामांमुळे वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील विकासकामांमुळे वाहतूककोंडी
ठाण्यातील विकासकामांमुळे वाहतूककोंडी

ठाण्यातील विकासकामांमुळे वाहतूककोंडी

sakal_logo
By

नावीद शेख : सकाळ वृत्तसेवा
मनोर, ता. ४ : ठाणे जिल्ह्यातील दोन पूल, तसेच रस्त्यांचे काम सुरू असल्याने याचा फटका पालघर जिल्ह्यातील वाहतुकीला बसू लागला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जव्हार फाट्यावर नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने रोखली जात आहेत. परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. हा त्रास मेअखेरपर्यंत होणार असल्याने छोट्या वाहनांनादेखील अडचण निर्माण होत आहे.

मुंब्रा बाह्यवळण (बायपास) रेतीबंदरजवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. ठाणे शहरातील साकेत आणि खारेगाव पुलांच्या दुरुस्तीचेदेखील काम सुरू आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहने जव्हार फाटा येथे रोखून धरली जात आहेत. दिवसभर वाहने रोखल्यानंतर रात्री नऊ वाजता अवजड वाहनांना मुंबई, ठाण्याच्या दिशेने सोडले जाते. अवजड वाहने महामार्गालगत दिवसभर उभी राहत राहतात. या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत, तसेच जव्हार फाटा भागात वाहनांच्या रांगा लागत असल्याने मालवाहतूक वाहने, रुग्णवाहिका, कारचालक आणि स्थानिकांची गैरसोय होत आहे.

ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे दोन अधिकारी आणि ३० कर्मचाऱ्यांचा ताफा महामार्गावर कार्यरत आहेत. दुपारच्या कडकडीत उन्हात अवजड वाहनांना रोखण्याचे काम करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा वाहतूक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.

वाहतूक मार्गात बदल
मुंब्रा बायपासवरील रेतीबंदरजवळील मुंब्रा-कौसा बाह्यवळण रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती आणि पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती काँक्रीटचा ओव्हरले करण्याचे काम सुरू करण्यात आले. ठाणे शहरातील खारेगाव, साकेत पुलाचे मास्टिक पद्धतीने डांबरीकरण, तसेच दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातवरून ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बायपासमार्गे प्रतिबंध करण्यात आला आहे.

केवळ रात्रीच्या वेळी प्रवेश
चिंचोटीमार्गे अंजूर फाटा, भिवंडी, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना रात्री ९ ते ते सकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश दिला जात आहे.

पर्यायी मार्ग
मनोरवरून (टेन नाका) मनोर-वाडा मार्गाने पाली-वाडा नाका-शिरीषपाडा येथून अबिटघर–कांबरे येथून पिवळी –केल्हे-दहागाव, वाशिंद मार्गे नाशिक, तसेच भिवंडीच्या दिशेने जाण्यासाठी २४ तास एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

साकेत, खारेगाव, तसेच मुंब्रा बायपास पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक नियंत्रण अधिसूचना लागू करण्यात आली आहे. काम पूर्ण झाले नसल्याने अवजड वाहतूक साधारणपणे मे अखेरपर्यंत वाहतूक रोखली जाईल. मालवाहतुकीचे मुख्य केंद्र असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील बंदरांना वाहतूक बदलाबाबत कळवण्यात आले आहे. कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात आहेत.
- मृदुला नाईक, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा