
१७ वर्षीय तरुणीवर मावस भावाकडून अत्याचार
मुंबई, ता. ३० : चार वर्षांच्या कालावधीत १७ वर्षीय मुलीवर तिच्या मावस भावाने अनेक वेळा बलात्कार केल्याची घटना घाटकोपरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीने इंटरनेटद्वारे एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधल्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली. सध्या पोलिसांनी मुलीला देवनार येथील निवारागृहात ठेवले आहे.
पीडित मुलीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर ती मावशीकडे घाटकोपर येथे वास्तव्यास होती. तिच्या पालकांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. आरोपी जेव्हा मुलगी घरी एकटी असायची तेव्हा तिला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. आरोपी तिला वसतिगृहात पाठवण्याची धमकीही देत होता. आरोपीने जुलै २०१७ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये आरोपी आणि त्याचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले आणि मुलगी पुन्हा तिच्या वडिलांच्या घरी परतली. मात्र मुलीने या घटनांबद्दल कुणालाही सांगितले नाही. अत्याचारामुळे मुलगी इतकी दुखावली गेली की ती मानसिक नैराश्याने ग्रस्त झाली होती. तिने एकदा आपले जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला होता.
...
सेवाभावी संस्थेची मदत
युवा चाइल्ड हेल्पलाईन या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पीडित मुलगी भेटली आणि आपल्या भूतकाळातील घटनांबद्दल माहिती दिली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास मदत केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.