
वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर ठाकूर यांचा एकहाती विजय
विरार, ता. ३० (बातमीदार) ः वसई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाचा विजय झाला आहे. सर्वच्या सर्व ११ जागा बविआने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी विरुद्ध सर्व पक्षांची आघाडी झाली होती. तरीही बाजार समिती राखण्यात त्यांना यश आले आहे.
वसई-विरारमध्ये सध्या महापालिका, पंचायत समिती, सहकार क्षेत्रातील बँका यावर बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. वसई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता, पण भाजपने इतर पक्षांना सोबत घेत राजेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचे धोरण आखले. ११ जागांसाठीची मतमोजणी रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता सुरू झाली होती, ती ७ वाजता संपली. यात बहुजन विकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. बहुजन विकास आघाडीच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप, श्रमजीवी संघटना, शिवसेना (ठाकरे) अशा सर्व पक्षांनी आघाडी केली होती, पण कार्यकर्त्यांचे जाळे, शिस्तबद्ध प्रचार आणि सहकार, ग्रामपंचायत क्षेत्रात असलेले प्राबल्य या जोरावर बहुजन विकास आघाडीने ही निवडणूक जिंकल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत रवींद्र पाटील, अरुण भोईर, चंद्रकांत भोईर, पांडुरंग पाटील, किशोर किणी, प्रणय कासार, अशोक कोलासो, मोरेश्वर पाटील, किरण पाटील, हरीश पाटील आणि जोसेफ परेरा हे उमेदवार विजयी झाले.
==================
कृषी उत्पन्न बाजरी समितीच्या इमारतीचे काम जागेअभावी रखडले होते. ते वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका, राज्य शासन आणि पणन महामंडळ यांच्या माध्यमातून मार्गी लावणार आहोत. इमारत झाल्यानंतर त्याचा फायदा येथील व्यापारी, शेतकरी यांना होणार आहे.
- अशोक कोलासो, नवनिर्वाचित सदस्य, बहुजन विकास आघाडी