
कर्जतमध्ये सहकार पॅनलचे वर्चस्व
नेरळ, ता. ३० (बातमीदार) ः कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान झाले. सहकार मतदारसंघात ९९ टक्के; तर व्यापारी मतदारसंघातून ८७ टक्के मतदान झाले. १० जागांसाठी प्रत्यक्ष मतदान शांततेत पार पडले. यामध्ये सहकार पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत आठ संचालक बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित दहा संचालकपदासाठी निवडणूक झाली. विकास संस्था सोसायटी सहकार मतदारसंघातील दहापैकी दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे त्या गटातील सात सर्वसाधारण संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यात सात जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात होते. विविध विकास सोयायटी सहकार मतदारसंघातील १६६ मतदारांपैकी १६४ मतदारांनी मतदान केले. तसेच व्यापारी आणि अडते गटातील दोन संचालक पदासाठी निवडणूक झाली असून चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात प्रवीण ओसवाल व दिनेश जैन निवडून आले.
या निवडणुकीत जे आठ संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत त्यात शेतकरी कामगार पक्षाचे चार, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आणि शिवसेना तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून प्रत्येकी एक संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत. प्रत्यक्ष झालेल्या मतदानात विष्णू कलेकर, अजित पाटील, गजानन पेमारे, प्रकाश फराट, कृष्णा बदे, शरद लाड, संतोष वैखरे, यशवंत जाधव, प्रवीण ओसवाल, दिनेश जैन हे सर्व सहकार पॅनलचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र गायकवाड आणि मदतनीस म्हणून सुनील दांगट यांनी काम पाहिले. आमदार महेंद्र थोरवे यांचे ज्येष्ठ बंधू माजी उपसभापती मनोहर थोरवे यांनी विजयी उमेदवारांचे मोठ्या मनाने अभिनंदन केले. त्या वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव, परशुराम घारे, अशोक सावंत, बाळू थोरवे, सीताराम मंडावळे, रणजीत जैन, बळीराम देशमुख, कैलास पोटे, शेतकरी कामगार पक्षाचे माजी सभापती नारायण डामसे, विलास थोरवे, काँग्रेसचे चंद्रकांत मांडे आदींनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.