
मुंबईतील बळाबद्दल भाजपला आत्मविश्वास
मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ३० ः संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबईतील महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली असेल, विकासकामांमुळे जनता पक्षाबद्दल सकारात्मक विचार करते आहे, असा विश्वास भाजप नेत्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीतील निकालांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांना मुंबईत सहानुभूती मिळते आहे काय, याचा विचारही आता सुरू करण्यात आला आहे. भाजपत क्रमांक दोनचे राष्ट्रीय नेते मानले जाणाऱ्या अमित शहा यांनी यासंदर्भातील सर्व बाबींचा आजच्या भेटीत सविस्तर ऊहापोह केल्याचे सांगण्यात येत आहे.
आज कुटुंबातील एका विवाहसमारंभासाठी मुंबईत आलेल्या अमित शहा यांनी विलेपार्ले येथे आमदार पराग अळवणी यांनी आयोजित केलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थित होते. शहांच्या या मुंबई भेटीमुळे मॉरिशस दौऱ्याहून नागपूरला ‘मन की बात’च्या प्रसारणाला हजर राहण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम सोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत थांबले, तर बंगळुरू येथे प्रचारासाठी गेलेले मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलारही तातडीने एक दिवसासाठी परत आले. ‘मन की बात’च्या प्रसारणानंतर पार्ल्यातील नागरिकांना भेटून शहा लगेच अळवणी यांच्या घरी पोहोचले. तेथे ज्येष्ठ नेते अमरीशभाई पटेल यांच्याशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी शहांनी संवाद साधला.
...
मुंबईतील स्थितीचा आढावा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी शहा यांनी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला. विकासकामे जनतेच्या पसंतीस पडत असून मुंबईकरांचा मूड हा आता राष्ट्रीय स्तराप्रमाणेच मोदींना कौल देणारा आहे, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. शिंदे सरकारने घेतलेला, मुंबईतील वॉर्डांची संख्या २२७ करण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयाचा निकाल लक्षात घेता पुनर्सीमांकन तसेच मतदारयाद्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात आहे, असेही त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. मुंबई महापालिका जिंकून बदला घ्या, असे आवाहन अमित शहा यांनी गणपती उत्सवादरम्यानच्या भेटीत भाजप कार्यकर्त्यांना केले होते. सुमारे २० मिनिटे चाललेल्या या बैठकीत आणखी काही बडे नेतेही हजर होते, असेही सांगितले जाते आहे.
...
छोट्या घटकांसमवेत...
मुंबईतील परिस्थिती तसेच महाराष्ट्रातले वातावरण यावर चर्चा झाली. मुंबईतील छोट्या घटकांना समवेत घेत त्यांचे प्रश्न सोडवण्याची योजना भाजपने तयार केली आहे. त्याचा गोषवाराही सांगण्यात आला. शिंदे गटाच्या आमदारांना ग्रामीण भागात पुरेसे अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे मुंबईत काय होईल, मातोश्रीवर निष्ठा असलेले ४० नगरसेवक प्रवेशाला उत्सुक होते, त्यातील किती जण पुन्हा जिंकू शकतील, त्यांच्या येण्यामागचे कारण काय, यावर सविस्तर मंथन झाल्याचेही समजते.
...
विकासकामे ही मुंबईची तहान!
विकासकामे ही मुंबईची तहान आहे. त्या आधारावरच या वेळी युतीला मते मिळतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी वर्तवल्याचेही सांगण्यात येते आहे; मात्र मुंबईतील विजयाबद्दल तिन्ही नेत्यांनी सखोल चर्चा सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे एका ज्येष्ठाने नमूद केले. लग्नसमारंभानंतर दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी संध्याकाळी पुन्हा एकदा या नेत्यांनी बंद दरवाजाआड चर्चा केल्याचे समजते. अमित शहा आणि एकनाथ शिंदे या दोघांनीच काही मिनिटे चर्चा केली, असेही सांगितले जात होते; पण या चर्चेस दुजोरा मिळू शकला नाही.
...
उद्धव यांना सहानुभूती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फुटीनंतर प्रचंड सहानुभूती मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याबद्दलचा धांडोळाही चर्चेचा विषय होता, असे सांगण्यात आले.
...
सभास्थानच छोटे
वज्रमूठ मालिकेतील सभा उद्या महाराष्ट्र दिनी मुंबईत होत आहे. यावर काही बोलणे झाले का, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे; मात्र एका ज्येष्ठ नेत्याने तीन पक्षांच्या एकत्र सभेसाठी घेतलेले मैदान आमच्या सभा होतात, त्यापेक्षा छोटे आहे, अशी माहिती देत विषय उडवून लावला. उद्या १ मे रोजी होणारी सभा विशेष असेल अन् विशाल असेल, असे ठाकरे गटाने अगोदरच स्पष्ट केले आहे.