कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

विरार, ता. ४ (बातमीदार) : चार नगरपालिका आणि ५३ गावांची मिळून वसई विरार महापालिका अस्तित्वात येऊन १३ वर्षांचा काळ लोटला आहे; परंतु महापालिकेत सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. आता थेट कर्मचारी भरतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे पालिकेत कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने त्यांचे भवितव्य अधांतरी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वसई विरार महापालिकेत मंजूर आकृतिबंधानुसार एकूण एक हजार २८ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी एका खासगी कंपनीची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या एजन्सीबरोबर करार झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सरळसेवा भरती करताना येथील कंत्राटावरील कर्मचाऱ्यांचा पहिला विचार करावा, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केली होती; तर दुसऱ्या बाजूला कंत्राटावरील कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य देण्यासाठी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे; परंतु न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असली, तरी या याचिकेबाबत किंवा भरती प्रक्रियेच्या कोणत्याही स्थगितीबाबत उच्च न्यायालयामार्फत महापालिकेला कोणतेही आदेश सद्यःस्थितीत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भरती प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनामार्फत सांगण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा असून लवकरच वर्ग क आणि ड संवर्गातील पदभरती करण्यात येणार आहे. यात पालघर जिल्ह्यात ७० टक्के जागा आरक्षित असणार आहेत; तर ३० टक्के जागा खुल्या वर्गासाठी असणार आहेत.

आता राजकीय पक्ष आणि नेते कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार की त्यांना कायम कंत्राटावरच ठेवणार, तसेच कंत्राटावरील कर्मचारी काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com