
महाराष्ट्र दिनाचा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः महाराष्ट्र दिन मुंबईसह उपनगरांत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी विशेष करून तरुणांनी विविध उपक्रमांत मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे या वेळी दिसून आले.
पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई : प्रबोधन शिक्षण संस्था संचालित राजे संभाजी विद्यालय आणि सदामंगल बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करत अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या प्रदर्शनात तब्ब्ल १० हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचसोबत या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे मतदार ओळखपत्र असणाऱ्या ग्राहकास माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून ५ टक्के अधिकची सवलत देण्यात येणार आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मतदान ओळखपत्र नसल्यास या प्रदर्शनात ते काढून दिले गेले. सोबतच डिजिटल जनजागृती मोहीमेंतर्गत मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधान परिषद गटनेते आणि आमदार ॲड. अनिल परब यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक विश्वनाथ महाडेश्वर, प्रबोधन शिक्षण संस्थेच्या कार्यवाह आणि माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, विधानसभा संघटक सुभाष कांता सावंत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे सचिव संदीप चव्हाण, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर, सदामंगल बुक डेपोचे प्रशांत शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी मयेकर यांनी केले.
म्हाडा मुख्यालयात ध्वजवंदन
मुंबई ः महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी खेरवाडीतील पोलिस पथकाने व म्हाडातील सुरक्षारक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. या वेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे, मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे यांच्यासह म्हाडाचे अभियंता आणि अधिकारी उपस्थित होते.
मुलुंडमध्ये भव्य शोभा यात्रा
मुलुंड (बातमीदार) ः ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहिर कोटेचा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिनानिमित्त मुलुंड पूर्व येथे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा मुलुंड पूर्वेतील चिंतामणी देशमुख उद्यान येथून सकाळी साडेआठ वाजता निघाली आणि भाजप मध्यवर्ती कार्यालय कॅम्पस हॉटेल येथे समाप्त झाली. या यात्रेत महिला कार्यकर्त्यांचे लेझिम पथक, छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा असलेले घोडेस्वार, तसेच लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर झाली. या वेळी माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, माजी नगरसेविका समिता कांबळे, नील सोमय्या, मंडळ अध्यक्ष मनीष तिवारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गट प्रणित माझा महाराष्ट्र नाका कामगार युनियनतर्फे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी युनियनचे अध्यक्ष बाबा कदम, खालिद शेख, बंधू शेठ, रमेश रामसिंग आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.
आर. आर. एज्युकेशनल ट्रस्टतर्फे ध्वजवंदन
मुलुंड (बातमीदार) ः महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने आर. आर. एज्युकेशनल ट्रस्ट येथे मराठी प्राथमिक व माध्यमिक विभागातर्फे ध्वजवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी आर. आर. एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. आर. आर. सिंग यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिर
घाटकोपर (बातमीदार) ः महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत घाटकोपर पूर्वेतील शिवराज क्रीडा मंडळ, पंतनगर आयोजित रक्तदान शिबिरात ४०० हून अधिक रक्तदात्यांनी उपस्थिती लावत रक्तदानातून महाराष्ट्र दिन साजरा केला. शिवराज क्रीडा मंडळाचे यंदाचे ३७ वे वर्ष आहे. दरवर्षी हे शिबिर आयोजित करून मंडळाच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहली जाते. या शिबिराला युवक व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षी पाहायला मिळतो, असे मंडळाचे अध्यक्ष सुरेश गोलतकर यांनी सांगितले. पूर्वेतील टेक्निकल हायस्कूल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर भरवण्यात आले. या शिबिराला राजावाडी रुग्णालय, पल्लवी रक्तपेढी आणि समर्पण ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराला मंडळाचे संस्थापक कैलास गोसावी, खासदार मनोज कोटक, आमदार पराग शहा आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दोशी महिला महाविद्यालयात नृत्य सादर
घाटकोपर (बातमीदार) ः घाटकोपर स्थित एस. पी. आर. जे. कन्याशाळा ट्रस्ट संचालित श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालय आणि एस. टी. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला. एनसीसीच्या विद्यार्थिनींनी शिक्षिका आणि एनसीसी ऑफिसर ज्योती माडये यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजवंदन केले. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्य प्रकार तसेच लेझिम सादर केले. महाराष्ट्रातील विविध समुदाय, परंपरा, संप्रदाय या सर्वांचा आढावा घेत अनेक अमराठी शिक्षकांनीही अभंग, ओवी, बालगीते, वीरगीते, लोकगीते सादर केली. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली. या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सीतालक्ष्मी सुब्रमण्यम, पर्यवेक्षक हर्षवर्धिनी पोटा या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर आशा मेनन यांनी प्रोत्साहन दिले.
मनसेतर्फे शिबिर
घाटकोपर (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग १२८ आणि १२९ चे उपविभाग अध्यक्ष नीलेश जंगम यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू म्हणून टिफिन व प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिराला मनसेचे नेते शिरीष सावंत, विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भटवाडी येथील मनसे जनसेवालय येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या प्राचार्यांचा सत्कार
वडाळा (बातमीदार) ः कामगार दिनानिमित्त, पवई मराठी शाळेत सामाजिक कार्यकर्ते भूषण पवार यांच्या हस्ते सोमवारी (ता. १) प्राचार्यांचा शाल, सन्मानचिन्ह व तुळस रोप देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, सामाजिक आणि कामगार दिनाचे महत्त्वाचे प्रबोधन करण्यात आले. तसेच सर्व शालेय विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देऊन आणि शाळेसाठी विशेष काळाची गरज म्हणून ब्लूटूथ स्पीकर भेट देऊन कार्यक्रम पार पाडण्यात आला.