
बलिवरे शाळेत भरला ‘हायजिन बाजार’
नेरळ, ता. १ (बातमीदार) : जग अद्ययावत होत आहे. त्याप्रमाणेच शिक्षणपद्धतीही बदलत आहे. शाळा जगाच्या पलीकडे जाऊन काही संस्था या मुलांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी धडपड करत असतात. यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धींगत होते. असाच काहीसा उपक्रम एम्पोवर इंडिया संस्थेच्या मदतीने बलिवरे शाळेत राबवण्यात आला. या शाळेत ‘हायजीन बाजार’ भरवण्यात आला होता. स्वच्छतेचे महत्त्व विशद करत यातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे देण्यात आले.
एम्पोवर इंडिया संस्थेच्या मदतीने बलिवरे शाळेत शुक्रवारी (ता. १) ‘हायजीन बाजार’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचा हेतू हा विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वातून स्वच्छताविषयक वस्तू निर्मिती करून तिची प्रत्यक्ष विक्री करणे असा ठेवण्यात आला होता. त्यामुळे मुलांना यात व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. खरेदी-विक्री संकल्पना स्वतःहून स्पष्ट झाली. आपल्याला फायदा झाला की तोटा हे समजले. यावेळी विद्यार्थ्यांसह शाळेचे शिक्षक, एम्पोवर इंडिया संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध स्टॉल्सचा अनुभव
विद्यार्थ्यांनी वस्तू निर्मिती करून सहा स्टॉलची मांडणी केली होती. यात हॅण्डवॉश, डिशवॉश, साबण, अगरबत्ती, कागदी पिशवी, केराचा डबा, वॉल पीस अशा विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. शाळा आणि विद्यार्थ्यांकडून आणखी सात स्टॉल लावले होते. ज्यात खाद्य साहित्य ठेवण्यात आले होते. मोठ्या उत्साहाने मुलांनी भेळ, सरबत, कोकम सरबत, अँपल सरबत, स्नॅक्स स्टॉल असे बरेच काही दुकाने लावली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू विकणे त्याचा अनुभव आला. व्यवहार ज्ञान समजले.