
वसई-विरार पालिकेच्या विकासकामांचा आढावा
वसई, ता. १ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले. तसेच महापालिकेच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
महापालिकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ३७२ कोटींची वसुली केली. तसेच नगररचना विभागामार्फत विकासशुल्क व इतर विविध शुल्कांतून विशेष मोहिमेद्वारे ३१५ कोटी वसुली करण्यात आली. याबद्दल सर्व करदात्या नागरिकांचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी आभार मानले. पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाद्वारे ४२८ लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत गर्भवतींना तीन हप्त्यांमध्ये पाच हजार रुपये महापालिकेमार्फत देण्यात येत असून आतापर्यंत ४२,१२३ जणांना लाभ झाल्याचे आयुक्तांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत वसई-विरार महापालिकेमार्फत राबवण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या व पदकविजेत्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. पालिकेच्या विविध करवसुली विभागांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचाही पुरस्कार देत सन्मान करण्यात आला.