
मिरा-भाईंदर महापालिकेत महाराष्ट्र दिन साजरा
भाईंदर (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेकडून आज (ता. १) महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयातील प्रांगणात आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याआधी काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला, तसेच भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महापालिकेतर्फे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापालिकेच्या विविध विभागांतील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना आयुक्त, अन्य अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्याचबरोबर शशांक कल्याणकर यांच्या स्वातंत्र्य गाथा या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.