
खड्यात पडून महिला जखमी
ठाणे, ता. १ : विहंग हॉटेलसमोर मेट्रोच्या पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यात एक ३० वर्षीय महिला पडल्याची घटना नुकतीच घडली आहे. रस्त्याने जाणाऱ्या इतर नागरिकांनी त्या महिलेला चिखलाच्या खड्ड्यातून बाहेर काढले. या घटनेत महिलेच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. घोडबंदर रोडवरील वर्धमान वाटिका येथे राहणारी महिला रविवारी (ता. ३०) दुपारी साडेचारच्या सुमारास ठाणे स्टेशनला जाण्यासाठी घरातून निघाली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर ती विहंग हॉटेलसमोरील फूटपाथ ओलांडून मुख्य रस्त्यावर रिक्षा पकडण्यासाठी येत होती. सर्व्हिस रोड ओलांडून ती फूटपाथच्या दिशेने येत असतानाच मेट्रो पिलरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात ती पडली. या खड्ड्यात पाण्यामुळे चिखल झाला असल्याने ती कमरेपर्यंत चिखलात अडकली. सुदैवाने तेथून जाणाऱ्या नागरिकांनी तिला खड्ड्यातून बाहेर काढले. त्या महिलेच्या उजव्या पायाच्या टाचेला दुखापत झाली आहे.