
दिघे स्थानकावरून कलगीतुरा
वाशी, ता. २ (बातमीदार) : ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दिघे ठेवण्यात आले आहे; पण या नावावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या नावाला विरोध करण्याएेवजी स्थानकाचे उद्घाटन करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका शिवसेना पक्षाने घेतली आहे. मात्र, काहीजण दिघा गावाची ओळख पुसून टाकण्याचा खटाटोप करत असल्याचा आरोप भाजपने केल्याने राजकीय वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
भाजपमध्ये दाखल झालेले ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजीव नाईक यांनी त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत दिघा रेल्वे स्थानकासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे रेल्वे स्थानकाला रेल्वे बोर्डाकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर २०१६ मध्ये रेल्वे स्थानकाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या कामासाठी मागील दोन टर्ममध्ये खासदार राजन विचारे यांनी रेल्वे बोर्ड, एमआरव्हीसी प्राधिकरणाकडे बैठका आणि पाहणी दौरे करून रेल्वे स्थानक निर्मितीचा प्रश्न तडीस लावला आहे.
---------------------------------------
निवडणुकांपूर्वी वातावरण तापणार
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केल्याप्रमाणे ‘दिघा’ऐवजी ‘दिघे’ करण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांसह उद्धव ठाकरे गटाचे नेते व विद्यमान खासदार राजन विचारे आणि महाविकास आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा प्रश्न निवडणुकीपूर्वी चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत.
------------------------
काही जणांना राजकारण करून पोळी भाजून घ्यायची सवय आहे. नावावरून बाऊ करून खो घालण्यापेक्षा वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना रेल्वे स्थानक खुले करून देणे गरजेचे आहे.
- विजय चौगुले, जिल्हाप्रमुख (शिवसेना)
--------------------
पश्चिम बंगालमध्ये दिघा रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘दिघा गाव’ देण्याची मागणी केली आहे. दिघा गावाची ओळख पुसू नये, यासाठी तीव्र संघर्षाची आमची तयारी आहे.
- नवीन गवते, माजी नगरसेवक