वाशीची मिनी ट्रेन रुळावरून गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीची मिनी ट्रेन रुळावरून गायब
वाशीची मिनी ट्रेन रुळावरून गायब

वाशीची मिनी ट्रेन रुळावरून गायब

sakal_logo
By

तुर्भे, ता. २ (बातमीदार) : शालेय परीक्षा झाल्याने सध्या सुट्टीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे लहानग्यांची पावले आपोआप उद्यानाकडे वळू लागली आहेत. अशातच नवी मुंबईत महापालिकेच्या वाशीतील मिनी सिशोरमधील उद्यानातील मिनी ट्रेन वर्षभरापासून बंद असल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.
शाळेच्या सुट्या सुरू झाल्या की लहान मुलांना पिकनिक, सहलीचे वेध लागतात. त्यासाठी नवी मुंबईत वाशी येथील मिनी सिशोर प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेकांची पाऊले या ठिकाणी असणाऱ्या मीनाताई ठाकरे उद्यानाच्या दिशेने वळत आहेत. मात्र, ऐन सुट्टीत बच्चे कंपनीसाठी असणारी मिनी ट्रेन बंद असल्याने पालिकेविरोधात नाराजीचा सूर आहे. नवीन वर्षात मिनी ट्रेन सुरु होईल, अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र, ही आशादेखील फोल ठरली असून उन्हाळी सुट्ट्या संपण्याची वेळ आली तरी मिनी ट्रेन मात्र सुरू होऊ शकली नसल्याने मुलांचा हिरमोड होत आहे.
----------------------------------------
पालकांच्या खिशाला झळ
पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने काही मोजक्या उद्यानात टॉय ट्रेन बसवण्यात आल्या आहेत. त्यात नेरूळ, वाशी आणि ऐरोलीमधील उद्यानांचा समावेश आहे. लहान मुलांकडून या ट्रेन राइडला चांगला प्रतिसाद आहे. पावसाळा संपला की ट्रेन सुरू होणे अपेक्षित असते. मात्र, ट्रेनच्या डागडुजीकडे लक्ष दिले जात नसल्याने अजूनही ट्रेन सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे मुलांच्या हौसेखातर महागड्या राईड्स कराव्या लागतात.
----------------------------------------------------
स्वच्छ भारत अभियानामध्ये मिनी ट्रेनची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही तांत्रिक अडचणींमुळे ट्रेन सुरू होण्यास विलंब झाला. मात्र, लवकरच मिनी ट्रेन सुरू होणार आहे.
- दत्तात्रेय घनवट, सहायक आयुक्त, वाशी विभाग