चिखलेत रंगला कुस्तीचा फड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलेत रंगला कुस्तीचा फड
चिखलेत रंगला कुस्तीचा फड

चिखलेत रंगला कुस्तीचा फड

sakal_logo
By

वाडा, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चिखलेत जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून अनेक मल्लांनी हजेरी लावली. यामध्ये महिला कुस्तीचेही आयोजन करण्यात आले होते. लातूर, सातारा, कोल्हापूर, दिल्ली, नाशिक आदी भागातून मल्लांनी आपले कुस्ती कौशल्य दाखवले. आठ तास या कुस्त्यांचा थरार सुरू होता. यामध्ये आंतरराष्ट्रीय मल्ल विनोद कुमार आणि विशाल भंडारी यांच्यात अंतिम लढत झाली. या अंतिम लढतीत दोन्ही मल्लांनी आपले कुस्तीकौशल्य दाखवले व कुस्ती समांतर सुटली.
चिखले येथे मागील २० वर्षांपासून कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या वेळी गावातील निवृत्त शासकीय कर्मचारी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात येत असतो. मागील दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद असलेली कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू करून ही परंपरा जपावी, या उद्देशाने युनिक फाऊंडेशन, वाडा यांनी यामध्ये पुढाकार घेऊन या कुस्त्या यशस्वी करण्यामध्ये योगदान दिले. युनिक फाऊंडेशन ही संस्था तालुक्यात कला, क्रीडा, शिक्षण व पर्यावरण क्षेत्रात काम करते. कुस्ती स्पर्धांच्या आयोजनात सर्व आर्थिक भार स्वतः घेऊन या स्पर्धांचे यशस्वी आयोजन नियोजन युनिक फाऊंडेशनने केले. या वेळी युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश सावंत, आमदार दौलत दरोडा, जिल्हा परिषद सदस्या भक्ती वलटे, संदीप पवार आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर कुस्ती मल्ल, कुस्तीप्रेमी उपस्थित होते.