
वंडर्स पार्कच्या उद्घाटनाचे वेध
वाशी, ता. २ (बातमीदार) ः शैक्षणिक वर्ष संपून शाळांना सुट्ट्याही लागल्या आहेत. त्यामुळे लहानग्यांची पावले बगिचे, उद्यानांकडे वळू लागली आहेत. नवी मुंबईत महापालिकेचे वंडर्स पार्क आकर्षणाचे केंद्र आहे; मात्र कोरोना काळापासून बंद झालेल्या वंडर्स पार्कची दुरुस्ती झाली असली तरी उद्घाटनासाठी होत असलेल्या विलंबामुळे बच्चेकंपनी नाराज आहे.
नेरूळ सेक्टर १९ मध्ये असलेले वंडर्स पार्क म्हणजे नवी मुंबईची ओळख आहे. शहरातील सर्वांत मोठे असलेल्या या उद्यानामध्ये अम्युझमेंट पार्कची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळे केवळ रविवारीच नव्हे, तर इतर दिवशीही इथे तोबा गर्दी होत असते. नवी मुंबईबरोबरच मुंबई, पनवेल, उरणपासून अगदी ठाणेकरदेखील एक दिवसीय सहलीसाठी येथे येत असतात. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये बच्चेकंपनीचे आवडते ठिकाण असलेले हे उद्यान नेहमीच गजबजलेले असते; मात्र दोन वर्षे हे पार्क कोरोना निर्बंधांमुळे बंद होते. २०२२ मधील दिवाळीच्या सुट्टीत हे पार्क खुले होणे अपेक्षित होते; मात्र अजूनही सुरू झाले नसल्याने पुढील सुट्टीच्या हंगामातच पार्क सुरू होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
--------------------------------
दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात
अम्युझमेंट पार्क सुरू करण्याबाबत सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता येथे असलेली खेळणी, विविध राईड यांच्या देखभाल-दुरुस्तीसह पार्कमधील इतर वस्तूंची डागडुजी, सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली होती. ती आता जवळजवळ पूर्ण झाली आहेत; मात्र आतील काही कामे अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे हे पार्क सुरू करता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
--------------------------------
पार्क बंद असल्याने दुसऱ्या शहरात जावे लागत आहे. या पार्कमध्ये आता नवीन खेळणी बसवली आहेत. आता हे पार्क सुरू झाले नाही, तर पार्कमधील खेळणी पावसात भिजून खराब होतील. या सुट्ट्यांमध्ये मुलांना पार्क सुरू असायला हवे.
- अनिता नाईक, रहिवासी
---------------------------------------
वंडर्स पार्कचे काम अंतिम टप्प्यात आहे. इलेक्ट्रिकचे काम सुरू असून या आठवड्यामध्ये पूर्ण होऊन वंडर्स पार्क सुरू करण्यात येईल.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका