दृष्‍टीक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्‍टीक्षेप
दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

sakal_logo
By

मालाडमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम
मालाड, ता. ३ (बातमीदार) ः महाराष्ट्र दिन, कामगार दिन, महापुरुषांची संयुक्त जयंती, तसेच बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, सामाजिक कार्यकर्ते शुद्धोधन आहेर, प्राध्यापक प्रदीप जानकर आदी मान्‍यवर या कार्यक्रमांना उपस्थित होते. या वेळी पुढच्या एक वर्षासाठी संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा श्याम झळके यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रोशनी पाटील, शोभना शिंदे, आशीष साळवे, धनाजी तोंडवलकर यांनी केले होते.

सफाई कामगारांचा सन्मान
मुंबादेवी, ता. ३ (बातमीदार) ः मेरा अधिकार मेरी जिम्मेदारी (मर्जी) या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधित मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी मनोज सागरे यांचा कुर्ला येथे एका कार्यक्रमात आदर्श कामगार म्हणून सन्मान करण्यात आला. कुर्ला पूर्व कामगार नगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला माजी न्यायाधीश डॉ. डी. के. सोनावणे, ॲड. तृप्ती पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुमेध जाधव, मर्जी संघटनेचे प्रमुख मंगेश सोनावणे, किशोर पालवे यांच्या हस्ते सागरे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मर्जी संघटनेने न्याय मिळवून दिलेल्या पीडितांना संघर्षशील व्यक्ती म्हणून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राप्ती कोळी यांनी केले.

कुरारमध्ये नेत्रचिकित्सा शिबिर
मालाड, ता. ३ (बातमीदार) ः मालाड पूर्व येथील तानाजी नगर बौद्धजन पंचायत समिती शाखा ४२३ च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्‍येष्ठ समाजसेवक अनंत येलवे होते, तर अर्चना जनेंद्रकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्‍यानंतर नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिराला १२० जणांनी सहभाग घेतला होता. शाखेतर्फे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक सुनील गुजर, आरपीआयचे दिंडोशी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या आशा रोखडे, कृष्णकांत सुर्वे, नामदेव चव्हाण आदींनी भाषणे केली. चंद्रशेखर जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुलुंड काँग्रेसतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः काँग्रेसच्या वतीने मुलुंड कॉलनी येथील कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त डॉ. आर. आर. सिंग यांनी एका कार्यक्रमाचे व महापूजेचे आयोजन केले होते. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक बी. के. तिवारी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद सिंग, समाजसेवक डॉ. बाबुलाल सिंग, डॉ. सचिन सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आम आदमी पक्षाचा मेळावा
कांदिवली, ता. ३ (बातमीदार) ः बोरिवली पश्चिम येथील एमएचबी कॉलनी सायली हॉलमध्ये कामगार मेळावा व रॅलीचे आयोजन आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाला आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेमन, मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्या आशा बक्षी व मुंबई प्रदेश उपाध्यक्ष तिलकराज शर्मा, भानुप्रसाद पांडे, प्रसाद घोलप व उत्तर मुंबईतील नेत्यांची उपस्थिती होती. चामुंडा सर्कलपासून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली. सायली हॉलमध्ये मराठी वाद्यवृंद कार्यक्रमांत महाराष्ट्रावर शौर्य गीत व प्रसिद्ध मराठी गाणी सादर करण्यात आली. अध्यक्षा प्रीती मेमन यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत जोमाने कामाला लागा, असे आवाहन केले.

शिक्षकांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानमाला
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) ः विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीतील सभागृहात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत संस्थेच्या प्रथेप्रमाणे शिक्षकांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानमाला व निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध शिक्षक, प्रशिक्षक व शिक्षणतज्ञ सुदाम कुंभार यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणी व सी. पी. डी. या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रा. सविना शेनॉय यांनी सोशल मीडिया ब्रॅण्डिंग व सीएसआर फंड या विषयी मार्गदर्शन केले. प्रा. संतोष कुमार ओझा, सदाशिव गायकवाड, रंजना नांदेडकर, लिली टेलीस या सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प. म. राऊत यांनी भूषवले होते.

शिरीष कणेकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः विनोदी कथाकार लेखक चंद्रशेखर राणे यांच्या ‘टेक इट इझी’ आणि लेखिका प्रा. प्रज्ञा पंडित यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक शिरीष कणेकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. ६) सायंकाळी ५.३० वाजता मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे होणार आहे. गेली अनेक वर्षे लेखन करणाऱ्या ॲड. चंद्रशेखर राणे यांच्या ‘टेक इट इझी’ या पुस्तकाचे लेखिका प्रज्ञा पंडित यांच्या ‘दिनविशेष’, ‘गुलमोहर’, ‘राष्ट्ररत्ने’, ‘दिवस विशेष’, ‘पानांवरचे जग’ या पाच पुस्तकांचे प्रकाशन शिरीष कणेकर यांच्या हस्ते होणार आहे. रसिकांसाठी विनामूल्य असलेल्या या प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शारदा प्रकाशनचे प्रकाशक डॉ. प्रा. संतोष लक्ष्मण राणे आणि प्रसिद्ध चित्रपट समीक्षक मनिष पंडित यांनी केले आहे.

सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः सरस्वती शिक्षण प्रसारक समिती संचालित कांजूरमार्ग येथील सरस्वती विद्यालयाच्‍या मराठी माध्यमातील शाळेत एन.एम.एम.एस. परीक्षेसाठी एकूण ३८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत एकूण २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी १७ विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता पात्र झाले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती पुढील पाच वर्षांच्या अभ्यासासाठी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. या सर्व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक वर्गातर्फे अभिनंदन करण्यात आले.