तांबड फुटण्यापूर्वीच टँकर सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांबड फुटण्यापूर्वीच टँकर सुसाट
तांबड फुटण्यापूर्वीच टँकर सुसाट

तांबड फुटण्यापूर्वीच टँकर सुसाट

sakal_logo
By

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. ३ : तालुक्याला दर वर्षी भीषण पाणीटंचाई भेडसावते. येथील आदिवासींची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. सर्व नागरिकांना वेळेत पाणी मिळावे, म्हणून पहाटेच तांबड फुटण्यापूर्वीच टॅंकर पाणीपुरवठ्यासाठी धावू लागतात. त्यामुळे तहानलेल्या गाव-पाड्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

मोखाडा तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या ६० ते ८० पर्यंत आहे. त्या गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची सरकार व्यवस्था करते. टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी येताच, तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा वरिष्ठ अधिकारी तेथील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांची पाहणी करतात. त्यानंतर टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला जातो. त्याला मंजुरी मिळताच, तहसीलदार कार्यालयाकडून टॅंकरची सोय केली जाते. मात्र, शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी यंत्रणा कामाला लागते. उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी योग्य आहे की नाही, त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते आणि त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत पाणीपुरवठा विभाग प्रत्यक्ष टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याला सुरुवात करतो.

सद्यस्थितीत मोखाडा तालुक्यात टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या ६९ वर पोहोचली आहे. त्यांना २० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. १२ हजार लिटर क्षमतेचे टॅंकर ८२ फेर्याद्वारे तहानलेल्या सुमारे ३७ हजार नागरिक आणि जनावरांची तहान भागवतात. मात्र, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन आणि टॅंकरचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अप्पर वैतरणा आणि पळसपाडा धरणातून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे.


पहाटे चार वाजताच टॅंकर धरणावर
प्रत्येक टॅंकर चालकाला चार ते पाच गावपाड्यांना पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे झोपेतून उठताच, तोंडावर पाणी मारून, टॅंकरचालक धरणाचा रस्ता धरतात. वेळेत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी टॅंकरचालकांची धडपड सुरू होते.

पाणी तपासणीसाठी टीसीएलचा वापर
टॅंकरमध्ये पाणी भरण्यापूर्वी ५० ते ६० ग्रॅम टीसीएल टॅंकरमध्ये टाकले जाते. त्यानंतर टॅंकरमध्ये पाणी भरण्यात येते. टॅंकरमधील पाणी परीक्षा नळीत घेऊन ओटी चाचणी केली जाते. त्यानंतर टॅंकर गाव-पाड्यांना पाणीपुरवठ्यासाठी मार्गस्थ होतात. ही संपूर्ण प्रक्रिया टॅंकरचालक करतात.

पारदर्शकतेसाठी प्रत्येक टॅंकरमध्ये जीपीएस
मोठ्या संख्येने टॅंकर आणि टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या आहे. टॅंकर इच्छित स्थळी कधी आणि कोणत्या वेळेत पोहोचला, याची माहिती तत्काळ मिळण्यासाठी प्रत्येक टॅंकरमध्ये जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याची चोरी, टॅंकरची सद्यस्थिती तातडीने प्रशासनाला कळते. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यात पारदर्शकता निर्माण झाली आहे.

केवळ एक कर्मचारी आणि शाबासकीची थाप
पाणीपुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा सांभाळण्यासाठी, पाणीपुरवठा विभागाचा एक कर्मचारी कार्यरत आहे. या नियोजनबद्ध आराखड्याची तो एकटा अनेक वर्षांपासून अंमलबजावणी करतो. टंचाई आणि पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेच या कर्मचाऱ्याला शाबासकीची थाप दिली आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात
मोखाडा तालुक्यात एकच पेट्रोल पंप आहे. तेथे कधी इंधन उपलब्ध नसल्यास, लगतच्या जव्हार अथवा त्र्यंबकेश्वर येथून तातडीने इंधन उपलब्ध करावे लागते. तालुक्यात गाड्यांच्या सुटे भाग आणि कुशल कारागिरांची वानवा आहे. त्यामुळे गाडीत बिघाड झाल्यास, लवकरात लवकर टॅंकरची दुरुस्ती अथवा दुसरा टॅंकर उपलब्ध करण्याचे आवाहन टॅंकरमालकापुढे उभे राहते; तर खेड्यापाड्यातील विहिरीवर जाणारे रस्ते खराब झाल्याने, टॅंकर विहिरीपर्यंत पोहोचण्याचे टॅंकरचालकाला कसब पणाला लावावे लागते.