ग्रामीणमध्ये निकृष्ट दर्जाची कामे

ग्रामीणमध्ये निकृष्ट दर्जाची कामे

कासा, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची अनेक कामे सुरू आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप अनेक गावांमधील नागरिकांकडून होत आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करताना कंत्राटदाराने रस्त्यांची दुरवस्था केली आहे, असे सांगण्यात आले.

डहाणू तालुक्यातील विरे गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी १.३६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या योजनेचे काम जवळपास महिन्याभरापासून सुरू करण्यात आले आहे. या नळपाणी पुरवठा योजनेचे काम करताना ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम आणि वन विभागाच्या अखत्यारित रस्त्यालगत खोदकाम करण्याची कोणतीही परवानगी न घेता, विरे गावातील मुख्य व अंतर्गत पक्के डांबरी रस्ते जलवाहिनीच्या खोदकामासाठी जेसीबीच्या साह्याने उखडून टाकण्यात आले आहेत.

खोदकाम करताना विरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतीला भेगा पडल्या असून शाळा धोकादायक बनली आहे. जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट सुरू असल्याबाबत विरे गावातील नागरिकांनी तक्रार केली आहे.

पालघर जिल्ह्यात नवीन ३५८ आणि दुरुस्ती २०६ अशा एकूण ५६९ पाणीपुरवठा योजनांपैकी सध्या ५४४ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र या योजना राबविताना ग्रामीण भागात मोठी अनियमितता होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नियुक्त कंत्राटदारांकडून अतिशय निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. जलवाहिनीसाठी खोदकाम करताना गावातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते खोदल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.

विरे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. खोदकाम करताना गावातील मुख्य डांबरी रस्ते उखडले असल्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत आहे.
- भरत वायेडा,
नागरिक

विरे गावात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू असून त्याठिकाणी डांबरी रस्ते खोदून काम निकृष्ट करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या कामाची पाहणी करून काही अनियमितता आढळल्यास कंत्राटदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- भानुदास पालवे,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, पालघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com