खांदा वसाहतीतील उद्यानांना अवकळा

खांदा वसाहतीतील उद्यानांना अवकळा

नवीन पनवेल, ता. ३ (वार्ताहर)ः कळंबोलीसह इतर वसाहतींमध्ये उद्यानांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असले तरी खांदा वसाहत अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या तीनही उद्यानांना अवकळा आली असून मनपाकडे हस्तांतरण झाल्यानंतर देखभाल-दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे.
खांदेश्वर रेल्वेस्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणात नव्याने इमारती झाल्याने लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. पंतप्रधान आवास योजनेची घरेही येथे बांधण्यात येत आहेत. या गोष्टीचा विचार करता वसाहतीमध्ये फक्त तीनच उद्याने आहेत. त्यापैकी एक सेक्टर ६ येथे अष्टविनायक हॉस्पिटलच्या बाजूला आहे. खांदेश्वर तलावासमोर असलेले हे उद्यान सर्वांनाच सोयीस्कर आहे. बाजूला झाडे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवाई होती. त्याचबरोबर उद्यानात जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. या व्यतिरिक्त लहान मुलांना खेळण्यासाठी छोटेसे चिल्ड्रन पार्क आहे. याठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खांदा वसाहतीतील नागरिकांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचे गार्डन आहे. असे असताना महापालिकेच्या उद्यान विभागाने हस्तांतर झाल्यानंतर दुर्लक्ष केले आहे.
-----------------------------------------------------------------
झाडे सुकल्यामुळे उजाड स्वरूप
या उद्यानात नागरिकांना बसण्यासाठी बाकडे होते. मात्र, ते सुद्धा तुटले असल्याने ज्येष्ठांना बसता येत नाही. जॉगिंग ट्रॅकची अवस्था सुद्धा फार चांगली नाही. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे; तर गेल्या सहा महिन्यांपासून सेक्टर सहाच्या या उद्यानाला पाणी मिळत नसल्याने हिरवाई नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेक झाडे सुकल्यामुळे उजाड स्वरूप आले आहे.
----------------------------------------------
खांदेश्वर तलावाचे सुशोभीकरण रखडले
खांदेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. या संदर्भात सिडकोकडे माजी नगरसेविका सीता पाटील, तसेच दिवंगत माजी नगरसेवक संजय भोपी यांनी पाठपुरावा केला होता. सिडकोने आराखडाही तयार केला होता; परंतु जीएसटीमुळे खर्चात वाढ झाल्याने हा प्रस्ताव रखडला असून पनवेल महापालिकेनेही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
---------------------------------------------
कळंबोली वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्यानांचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता महापालिका प्रशासनाने मोठ्या निधीची तरतूद केली आहे. मात्र, खांदा वसाहतीतील हाताच्या बोटावर मोजण्यापुरती असलेल्या गार्डनकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
- सीता पाटील, माजी उपमहापौर, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com