
धानिवरी प्रकल्पबाधितांच्या खात्यावर पैसे जमा
कासा, ता. ८ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून डहाणू तालुक्यातील धानिवरी येथील प्रकल्पबाधितांच्या प्रकरणामुळे गदारोळ उठला आहे. अखेर प्रशासनाने घर पाडलेल्या बारा प्रकल्पबाधितांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. त्याचबरोबर त्यांची निवाऱ्याची सोयदेखील करण्याचे काम सुरू होत आहे, असे डहाणू तालुक्याचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले.
मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेमध्ये धानिवरी येथील बारा घरांचा प्रकल्पाला अडथळा होत आहे. सरकारने पोलिसांच्या मदतीने जबरदस्तीने घरे हटवल्याने गेले अनेक दिवस हे प्रकरण गाजले होते. यासाठी स्थानिक आमदार, सामाजिक संस्थांनी आंदोलने केली होती. या बारा प्रकल्पबाधितांच्या खात्यात त्यांच्या घराच्या किमतीप्रमाणे रकमा जमा झाल्या आहेत; तर दोन वेळा सरकारने जीवनावश्यक वस्तू दिल्या. सध्या त्यांच्या निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी काम सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाला २० किलो तांदूळ, दहा किलो गहू यांचे धानिवरी सरपंच शैलेश कोरडा यांच्या हस्ते वाटप केले, असे सांगण्यात आले.