
आंब्याचे दर अजूनही कडाडलेलेच
वज्रेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : यंदा लहरी हवामानामुळे कोकणातील आंबा ग्रामीण व शहरी बाजारपेठांमध्ये कमी प्रमाणात आला आहे. मात्र कर्नाटक, आंध्र प्रदेश व वापी (गुजरात) या परराज्यांतील आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. इतर राज्यांतील आंबा कोकणातील हापूसच्या नावे ग्राहकांच्या माथी मारून व्यापारी पैसा कमवत आहेत, पण आंब्याचे दर अजूनही कडाडलेलेच असून परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या रायवळी, हापूस, केशराच्या प्रतीक्षेत येथील खवय्ये आहेत.
ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण भागात मोठ्या क्षेत्रावर आंबा पीक घेतले जाते. विशेषतः या ठिकाणी पिकविला जाणारा हापूस, केशर आंब्याची चव अप्रतिम असते. येथील शेतकरी हा कुठल्याही प्रकारचे रासायनिक पावडर, द्रवपदार्थ न वापरता नैसर्गिक पिकवून येथील आंब्याची विक्री केली जाते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील आंबा ग्रामीण भागातील बाजारपेठांत दाखल होताच काही दिवसांताच जिल्ह्यातील रायवळ, हापूस, केशर आंबा दाखल होतो. मात्र या वर्षीच्या हवामान बदलाचा मोठा फटका येथील स्थानिक आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आंबा बाजारपेठांमध्ये दाखल होण्याआधीच कर्नाटक, आंध्र प्रदेश, वापी (गुजरात) येथील आंबा मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. कर्नाटकी हापूस, केशर ६०० ते ७०० रुपये डझन, तर दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबाडी व स्थानिक बाजारपेठेत बहुतांशी आंबा हा परराज्यांतील असून स्थानिक हापूसच्या नावे ग्राहकांच्या माथी मारला जात आहे.
....
स्थानिक आंब्याचे उशिरा आगमन
यंदा ढगाळ वातावरणात ५० टक्के मोहोर जळून गेला, त्यानंतर आलेल्या अवेळी पावसामुळे २५ टक्के मोहोर, लहान कैरी गळून गेली. उर्वरित आंबे अजूनही बाजारात न आल्याने या रायवळी, हापूस, केशरच्या प्रतीक्षेत येथील खवय्ये आहेत.
....
सध्या आंबा काढणीचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत स्थानिक हापूस, केशर आंबा बाजारपेठेत दाखल होईल.
- सुभाष भोईर, आंबा उत्पादक शेतकरी, वेढेपाडा
....
आंबा विक्रीतून दलालच अधिक पैसे कमावतो, आंबा नाशवंत असल्याने १५ ते २० टक्के आंबे खराब होत असतात.
- रवींद्र पातकर, फळ विक्रेता, अंबाडी नाका