कासाडी नदीला संजीवनी

कासाडी नदीला संजीवनी

नवीन पनवेल, ता. ३ (वार्ताहर)ः अनेक वर्षांपासून तळोज्यातील कासाडी नदीतील प्रदूषणाचा मुद्दा विविध स्तरांवर गाजत आहे. या नदीलगत असलेल्या कारखान्यांमुळे झालेले प्रदूषणावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अशातच आता आयआयटी मुंबईच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने कासाडी नदी पुनर्जीवित करण्याचा २३५ पानांचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला असल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या कासाडीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तळोजा एमआयडीसीतून वाहणाऱ्या कासाडी नदीचे पाणी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष मुंबई आयआयटी या संस्थेने काढला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर एमआयडीसीतील वेगवेगळ्या तीन ठिकाणांहून नदीच्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता पाण्यातील द्रवरूप ऑक्सिजनची घनता कमी झाली आहे. तसेच रसायनांचे प्रमाण वाढल्याने जलचरांना धोका निर्माण झाल्याचे निष्कर्ष काढला आहे. नदीमधील या प्रदूषणावर माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आवाज उठवल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादानेदेखील या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार कासाडी नदीतील पाण्याची शुद्धता तपासणी करण्याच्या सूचना लवादातर्फे संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसेच आयआयटीला याबाबतचा नियोजन आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले होते, त्या अनुषंगानेच कासाडी नदीच्या पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी मुंबई आयआयटीच्या पथकांनी काही दिवसांपूर्वीच तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले होते. तळोजा एमआयडीसीमधील उद्योगांमधून कासाडी नदीत विनाप्रक्रिया करता रासायनिक पाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
--------------------------------------------
अहवालातील महत्त्वाच्या शिफारशी
- कंपन्यामधून निघणारे सांडपाणी वेस्ट केमिकलवर प्रक्रिया करून त्याचा योग्य निचरा करण्यासाठी पाईपलाईन बांधणे.
- नदीकिनारी असलेल्या उद्योगांना त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास सांगणे.
- नदीमध्ये होणारे कचऱ्याचे विसर्जन रोखण्यासाठी औद्योगिक वसाहतीमधील संबंधित संस्थांशी समन्वय साधणे.
- नदी पुनर्जीवित करण्यासाठी वृक्षारोपण करणे.
- नदीमध्ये वर्षानुवर्ष साचलेला केमिकलचा गाळ बाहेर काढणे.
--------------------------------------------
नदीमुळे भूजल पिण्याअयोग्य
कासाडी नदीचे स्वरूप मर्यादित नसून ही नदीपुढे तळोजा खाडीत वाहत जाते. त्यामुळे नदीतील प्रदूषित पाण्याच्या दुर्गंधीने किनारी असणाऱ्या वसाहतींमधील नागरिकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय कासाडी नदीतील पाण्यामुळे जलचर, पाण्यातील वनस्पती आदी सजीवांच्या जीवाला धोका पोहोचला आहे. तसेच हे पाणी भूजल साठ्यात मिसळल्यामुळे पिण्याचे पाणी, माती प्रदूषित झाली आहे.
----------------------------------------------
रंग बदलणाऱ्या नदीची ओळख
पनवेल तालुक्यातील कासाडी ही महत्त्वाची नदी आहे. ही नदी हंगामी स्वरूपाच्या आहे. त्यामुळे एकीकडे कडक उन्हामुळे धरणं कोरडी पडलेली असताना दुसरीकडे मात्र या नदीचे पात्र अनेक ठिकाणी ओले दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे पाणी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रंगाचे असल्याने रंग बदलणारी नदी अशी ओळख आहे.
------------------------------------------------------
कासाडी नदीत वर्षानुवर्षे प्रदूषण होत राहिले आहे. मुंबई आयआयटीने नदीचा सखोल अभ्यास करून नदी प्रदूषणाची कारणांसोबत उपाय सुचवले आहेत. त्यानुसार कार्यवाही करून नदी प्रदूषणमुक्त करणे गरजेचे आहे.
- अरविंद म्हात्रे, याचिकाकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com