Sharad Pawar : शरद पवार ही महाराष्‍ट्राची गरज; डॉ. जितेंद्र आव्हाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad sharad Pawar
शरद पवार ही महाराष्‍ट्राची गरज

Sharad Pawar : शरद पवार ही महाराष्‍ट्राची गरज; डॉ. जितेंद्र आव्हाड

ठाणे : शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. पवार हे सक्रिय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. सध्या राज्यात राजकारण संस्कृतीहीन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आर्थिक, उद्योग, राजकीय या सर्वच क्षेत्रांत नुकसान होत आहे. ते थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

तसेच पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत असल्याची माहितीही आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह सबंध ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविले आहेत.

‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. याला पक्षातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. पवार यांनी ही घोषणा करताच अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवला. तसेच निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड भावुक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, सध्या राज्यात वादळ घोंघावत आहे. या घोंघावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवार हे नाव पाठीशी असलेच पाहिजे. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहित आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे. कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल, पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये, असे शरद पवार हेच आपणाला सांगत आले आहेत. आज कोणाचाही विचार न करता त्यांनी राजीनामा देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत, ते केवळ शरद पवार या एकाच शब्दामुळे.

माझा राजकीय प्रवास शरद पवार या नावाने चालू झाला. आमचे सर्वांचे जीवन पवारांशी जोडले गेलेले आहे. म्हणूनच आम्ही आजही सांगत आहोत की, शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांना राजीनामा परत घ्यावाच लागेल.
- डॉ. जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस