
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे मुरबाडमधील सरपंचांकडून आभार
मुरबाड, ता. ४ (बातमीदार) : कोरोना आपत्तीच्या काळात आलेल्या अडचणींमुळे विकासकामांवर खर्च होऊ न शकलेला एक कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी मुरबाड तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून परत मिळाला आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निर्देशानंतर राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाने कार्यवाही करुन शासन निर्णय जारी केला आहे. याबद्दल मुरबाडमधील सरपंचांकडून कपिल पाटील यांचे आभार मानण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये जनसुविधा अंतर्गत मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला होता. मात्र, कोरोना साथीमुळे २० ग्रामपंचायतींना वेळेत निधी खर्च करता आला नव्हता. राज्य सरकारच्या निर्णयानुसार २० ग्रामपंचायतींच्या वाट्याचा एक कोटी २१ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारकडे परत गेला होता. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या विकासकामांवर परिणाम झाला होता. तालुक्यातील सरपंचांनी ही व्यथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना सांगितली. तसेच राज्य सरकारकडे परत गेलेला निधी परत मिळवून देण्याची विनंती केली होती.