रस्त्यांची सर्व कामे युध्दपातळीवर पूर्ण करा - आयुक्त अभिजीत बांगर

रस्त्यांची सर्व कामे युध्दपातळीवर पूर्ण करा - आयुक्त अभिजीत बांगर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यापुरतेच नव्हे तर कायमस्वरूपी नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांचा आढावा घेत सर्व कामे मे अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले. तसेच शहरातील रस्ते हे विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित येत असून त्यांच्यामार्फत सुरू असलेली सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने कामांची गती वाढवावी व पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीला सर्वतोपरी सामोरे जाण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.
ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती मार्ग, घोडबंदर रोड या ठिकाणी मेट्रो ४ आणि ४ ए, तसेच मेट्रो ५ अंतर्गत कामे सुरू आहेत. या सर्व ठिकाणी साफसफाई, गटारांची बांधणी, गटारे नाल्याला जोडणे आदी कामे प्राधान्यक्रमाने करावीत. तसेच ज्या ठिकाणी काम सुरू आहे, तेथेच बॅरिकेटिंग असेल, अन्य ठिकाणी बॅरिकेटिंगची आवश्यकता नसल्यास ते काढण्यात यावे, अशा सूचना मेट्रो प्राधिकरणाला दिल्या. कापूरबावडी ते गायमुख रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असून या रस्त्याची संपूर्णपणे पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करणे, काँक्रिट रस्त्यावरील भेगा भरणे, पेव्हर ब्लॉकच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणे, संपूर्णपणे रस्त्याची साफसफाई व रंगरंगोटी करण्याबाबतची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

बैठकीतील सूचना
माजिवडा नाका ते आत्माराम पाटील चौकापर्यंतच्या रस्त्यावरील साकेत पुलावरील वाढीव रस्त्याच्या जोडणीचे काम करणे, पुलावरील रस्त्याची कामे मास्टीक अस्फाल्ट पद्धतीने पूर्ण करणे, लेन मार्किंग, कलर्व्हटची कामे व साफसफाई करणे.
मुंब्रा बायपासवर गेल्या वर्षी दरड कोसळ्ण्याचे प्रकार घडले आहेत, या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण मुंब्रा बायपासची पाहणी करून दरड कोसळू नये या दृष्टीने निखळलेले दगड, माती हटविणे, कलव्हर्टचे काँक्रिटीकरण करणे, सांधे भरणे, संलग्न असलेल्या गटारांची कामे आदींबाबत संबंधितांनी युद्धपातळीवर काम करणे.
एमएमआरडीए अंतर्गत असलेल्या मुंब्रा व्हाया कल्याण फाटापर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजक, स्पीड ब्रेकर, काँक्रीट रोडचे सांधे भरून साफसफाई व रंगरंगोटीची कामे करणे. त्याचप्रमाणे पूर्वद्रुतगती महामार्गावरील आनंदनगर नाका ते माजिवडा जंक्शनवरील डांबरीकरण रस्त्याची दुरुस्ती करून उर्वरित कामे करून कलव्हर्ट व गटारांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत.
कल्याण फाटा ते महापे रोड हे एमआयडीसीच्या अखत्यारित येत असून संपूर्ण रस्त्यावरील डेब्रीज उचलणे, फूटपाथची दुरुस्ती करणे व काँकीट रस्त्यावरील सांधे भरून साफसफाई करणे पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व प्राधिकरणांनी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशा सूचनाही महापालिका आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या.

................................

शहरामध्ये महापालिकेसह बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, एमआयडीसी, मेट्रो इ. इतर संस्थांच्या मालकीचेही रस्तेही आहेत. शहरात कुठल्याही रस्त्यावर खड्डा जर पडला तर नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो. महापालिका व इतर सर्व यंत्रणा यांचे कर्तव्य आहे, या यंत्रणांनी स्वत: प्रयत्न करून व इतर यंत्रणांशी संवाद ठेवून खड्डेमुक्त रस्ते पावसाळ्यापूर्वी शहरवासीयांना उपलब्ध करून द्यावेत.
- अभिजीत बांगर, आयुक्त, ठामपा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com