
महापालिकेच्या शाळांमध्ये शहरी शेतीचा प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शेतीकडे ओढ निर्माण व्हावी यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील पालिकेच्या शाळांमध्ये शहरी शेतीचा प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे. शाळांमधून पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा वापर मुलांच्या मध्यान्ह भोजनामध्ये होणार आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांना विविध विषयांत प्रोत्साहन देण्यात येत आहे. माटुंगा येथील वाघजी केंब्रिज शाळेसह चेंबूरमधील शाळेत शहरी शेतीअंतर्गत छतावरील शेती अर्थात रुफ गार्डनिंगची संकल्पना राबवण्यात आली. आता ही संकल्पना महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये राबवण्याचा मानस आहे. या शाळांमधून पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यांचा वापर मुलांच्या मध्यान्ह भोजनांमध्ये करण्याचा विचार महापालिका शिक्षण विभागाचा आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुले आता खऱ्या अर्थाने शेतकरी बनणार असून स्वत: भाजी पिकवून स्वत:च्या मध्यान्ह भोजनाची सोय करणार आहेत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. माटुंगा येथील वाघजी केंब्रिज शाळेसह चेंबूरमधील शाळांत शहरी शेतीअंतर्गत छतावरील शेती अर्थात रुफ गार्डनिंगची संकल्पना राबवण्यात आली आहे. या शाळांमधील प्रयोग यशस्वी होत आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
...
वाघजी शाळेचा प्रकल्प
पर्यावरणीय बदलांबाबतचे शिक्षण हे केवळ पुस्तकी मर्यादित न ठेवता या शिक्षणाचा दैनंदिन आयुष्यात वापर करण्यासाठीचे धडे महापालिकेच्या माटुंग्यातील एमपीएस एल. के. वाघजी शाळेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, पालकांचा आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता. नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या १५४ मुलांच्या सहभागातूनच नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीची संकल्पना राबवण्यात आली. त्यासोबतच शहरी शेतीमध्ये छतावरील शेतीलाही प्रोत्साहन देण्यात आले.
...
७०० शाळांमध्ये उपक्रम
वाघजी शाळेप्रमाणे चेंबूर कलेक्टर शाळेतही अशा प्रकारच्या शहरी शेतीचा प्रकल्प राबवण्यात आला. या दोन्ही शाळांमध्ये राबवण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगानंतर महापालिकेच्या २५० शालेय इमारतींमध्ये शहरी शेती उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे ६०० ते ७०० शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाण्याचा मानस महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आहे.
...
मुलांना शेतीविषयक कामांमध्ये आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून शेतीसारख्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे हाही प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेचा निधी खर्च केला जाणार नसून यासाठी आवश्यक असणारा निधी सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
- अजित कुंभार, सहआयुक्त, शिक्षण विभाग, मुंबई महापालिका
...
विद्यार्थ्यांना फायदा काय?
मुंबईत स्थायिक झालेल्या बहुतांश नागरिकांचा ग्रामीण भागाचा संबंध तुटला आहे. त्यामुळे शेतीशी विद्यार्थ्यांचा संबंध राहिलेला नाही. विद्यार्थ्यांचे शेतीशी नाते निर्माण व्हावे, शेतीची मशागत कशी करावी, पीक कसे तयार करावे, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पर्यावरणाशी सुसंगत हा उपक्रम असून पर्यावरणाचे त्यामुळे रक्षण होण्यास मदत होईल. शहरी शेतीचा प्रयोग करताना विद्यार्थ्यांना संघटित काम करता येईल. ताज्या भाज्या आणि फळे शहरी शेतीमुळे मिळू शकतील. एकत्रित काम करण्याचा सामाजिक संदेशही त्यानिमित्त विद्यार्थ्यांना मिळेल. शेतीविषयक विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध होतील. भविष्यात विद्यार्थ्यांत शेतीविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थी शेतीकडे वळावेत हा उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शहरात व्यावसायिक शेती शक्य आहे का, याचीही चाचपणी या निमित्ताने होण्याची शक्यता आहे.