
पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कालवार गावच्या हद्दीत घडली. शुभम जितेंद्र चौरसिया (वय १४) आणि सत्यम पन्नीलाल चौरसिया (वय ९) अशी मृत मुलांची नावे आहेत. दगड खदानीत पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी ही मुले गेली होती.
शुभम व सत्यम हे दोघे नारपोली बालाजीनगर येथील यादव बिल्डिंगमध्ये राहत होते. मंगळवारी (ता. २) दुपारी २ वाजता ग्लोबल हॉस्पिटलसमोरील खुल्या जागेत ते खेळण्यासाठी गेले होते. बराच वेळ होऊनही मुले घरी न आल्याने पन्नीलाल चौरसिया यांनी पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, बुधवारी (ता. ३) दगडाच्या खाणीतील पाण्यात दोन लहान मुलांचे मृतदेह दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता ही हरवलेली मुलेच असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भोईवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.